Chandrakant Patil_Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : कोल्हापूरात हसन मुश्रीफ प्रचंड हतबल : कोरेंच्या आडून चंद्रकांतदादांचा दबाव; राष्ट्रवादीला जाणवतेय अजितदादांची उणीव

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपने जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव वाढवला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुश्रीफ एकाकी पडल्याने जिल्ह्याच्या सत्तेचे दोर भाजपच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

सुनिल पाटील

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जाणार नाही, याची खात्री असल्यानेच ‘जनसुराज्य’च्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस व पर्यायाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. यात राज्यपातळीवर अजित पवार यांच्यासारख्या खमक्या नेत्याची उणीव ही मंत्री मुश्रीफ यांच्यासमोरची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे भाजप म्हणेल त्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतील सत्तेचे आराखडे होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या महायुतीकडेच राहणार, हे अंकगणित जवळपास स्पष्ट आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्याच्या या प्रक्रियेत महायुतीतच ‘लहान भाऊ-मोठा भाऊ’ असा अंतर्गत पण सुप्त संघर्ष उफाळून आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला महापौरपद मिळाले. त्या पॅटर्ननुसार जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावर हक्क सांगण्याची रणनीती आखली आहे. ‘ज्याच्याकडे संख्याबळ, त्याच्याकडे नेतृत्व’ हा सरळ तर्क राष्ट्रवादी मांडत आहे.

मात्र, सत्तेतील समतोल आणि भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपकडून वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे संकेत आहेत. त्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणासह ‘गोकुळ’, जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ यांचे मित्र असलेल्या ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. कोरे यांना सोबत घेण्याची रणनीती आखली जात आहे. भाजप एकीकडे ‘जनसुराज्य’चा दाखला देत सत्तास्थापनेचा दावा करत असताना त्यावर डॉ. कोरे यांचे सूचक मौनही बरेच काही सांगून जाते. त्यामागे राष्ट्रवादीने नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत ‘जनसुराज्य’विरोधात घेतलेल्या सोयीच्या भूमिकेचा संदर्भ आहे.

आजरा, चंदगड, गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीने शरद पवार पक्षासोबत, शाहूवाडीत शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षासोबत केलेली आघाडी असेल किंवा डॉ. कोरे यांचा बालेकिल्ला असलेल्या पन्हाळ्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी असेल, ही कारणेही त्यामागे आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे २० सदस्य असले, तरी भाजपने त्यांचे १२, ‘जनसुराज्य’च्‍या चिन्हावरील ५ व अमरसिंह पाटील यांच्यासह ६, शिवसेनेचे ९ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे ४, अशा ३१ जणांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही, ही खात्री आहे. त्यामुळेच भाजपकडून राष्ट्रवादीविरोधात दबावाचे राजकारण सुरू आहे. जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच आहे. आमचे 12 व जनसुराज्यचे 6 असे मिळून आमचे सदस्य 18 होतात. त्यामुळे 18 आणि 20 यात फार फरक पडत नसल्याने जिल्हा परिषदेत पहिला अध्यक्ष भाजपचा व्हावा, असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. परिणामी, सर्वाधिक जागा जिंकूनही राष्ट्रवादीत अस्वस्थता कायम आहे.

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे की, भाजपकडे राहणार या महायुतीच्या चर्चेला अद्यापही वेळ मिळालेली नाही. राष्ट्रवादीनेही ‘संख्याबळाचा सन्मान’ या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, या भूमिकेवर भाजपसह इतर घटक पक्ष त्यांना कितपत मदत करतात किंवा घटक पक्षांकडूनही भाजपच्याच अध्यक्षपदाचा आग्रह धरतात का, हे प्रत्यक्ष महायुतीच्या बैठकीतच समजणार आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेला गती येईल.

कळीचा मुद्दा...

देशात आणि राज्यात जे-जे पक्ष भाजपसोबत आले आहेत किंवा ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना स्वतःची अशी भूमिका घेण्याची संधी भाजपच्या शिरस्थ नेतृत्वाकडून दिली जात नाही. भाजप जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी कटिबद्ध राहणे एवढेच घटक पक्ष असो किंवा बाहेरून आलेल्या नेत्यांना करावे लागते. भाजपचे हे वैशिष्ट्यही जिल्हा परिषदेच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT