Kolhapur News, 16 Feb : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी आता भाजपने अध्यक्षपदावर दावा केल्याने महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपच्या १२ व महायुतीतील सहयोगी जनसुराज्य पक्षाच्या ५ जागांच्या जोरावर पहिल्या सव्वा वर्षाचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे, अशी भूमिका मंत्री चंद्रकात पाटील यांनी घेतली आहे.
तर दुसरीकडे झेडपीत जास्त जागा निवडून आल्याचा दावा करत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. मात्र, मुश्रीफांच्या या दाव्यानंतर खासदार धनंजय महाडिकांनी भाजपला ३ लाख ४२ हजार मते तर राष्ट्रवादीला ३ लाख ४१ हजार मते मिळाल्याची मतांची आकडेवारी दाखवली.
या आकडेवारीनुसार भाजप हा मोठा भाऊ असून जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवल्याचं महाडिक म्हणालेत. तर महायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत, त्यामुळे आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत, असे महाडिकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने २० जागा जिंकल्या आहेत; पण भाजपचे १२ व भाजप सहयोगी असलेल्या 'जनसुराज्य'चे ५ असे १७ सदस्य होतात, त्यामुळे पहिला सव्वा वर्षांचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी भूमिका मंत्री पाटील यांनी बैठकीत मांडली.
त्यावर अध्यक्ष सव्वा वर्षाचाच करायचा असेल तर पहिली संधी राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीत केली. यापूर्वी शौमिका महाडिक यांच्या रूपाने भाजपचा अध्यक्ष झाला आहे, आता राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा, अशी भूमिका मुश्रीफांनी मांडल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजपने जास्तच ओढाताण केल्यास मुश्रीफ काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मदत घेणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण झेडपीच्या निकालानंतर सतेज पाटील यांनी, "कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे.
मात्र ते महायुती म्हणून लढलेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार केला असता. मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू", असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता मुश्रीफ पाटलांची मदत घेणार की भाजपसोबतच जुळवून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.