चिपळूण : कोयना धरणातून वीजनिर्मिती संचाकडे पाणी वाहून देणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकल्पाचे सुरक्षा ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोयना प्रकल्पाचे १९७६ नंतर सुरक्षा ऑडिट झालेले नाही. वीजनिर्मितीसाठी पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागल्यानंतर सुरक्षा ऑडिटची गरज आहे.
याबाबत माहिती देताना जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक म्हणाले, कोयना प्रकल्प महाराष्ट्राचे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. १६ मे १९६२ रोजी कोयना जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती सुरू झाली. राज्यातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी ५९ टक्के या प्रकल्पातून मिळते. या प्रकल्पाला ६० वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी असणारी यंत्रसामग्री कालबाह्य होण्याची शक्यता आहे. हे अधिजल भुयाराला लागलेल्या गळतीवरून स्पष्ट झाले आहे.
कोयना धरणातील पाणी सर्जवेलच्या ठिकाणी आणले जाते आणि तेथून ते वीजनिर्मितीसाठी पाठवले जाते. या बोगद्यांना दिलेले सिमेंटचे आच्छादन निघाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी काळ्या दगडातून झिरपून डोंगरात ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बाहेर पडत आहे. त्याचा धोका कोयना प्रकल्पाला नाही; मात्र कोयना हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. येथे साठ वर्षात काही हजार भूकंप झाले आहेत.
३ रिश्टर स्केलपेक्षा मोठ्या भूकंपाची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कालानुरूप काही गोष्टी बदललेल्या असू शकतात. त्यामुळे स्ट्रक्चरचे सुरक्षा ऑडिट होण्याची गरज आहे. कोयना धरण मजबूत स्थितीत आहे. पोफळी, अलोरे आणि कोळकेवाडी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या संचाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जाते.
कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा एक व टप्पा दोनची क्षमतावाढ नुकतीच झाली आहे. दोन्ही प्रकल्पातून पाच मेगावॅट क्षमता वाढ झाली आहे. त्यामुळे धरण आणि वीजनिर्मिती करणाऱ्या संचाच्या सुरक्षा ऑडिटचा प्रश्न येत नाही; मात्र धरणापासून ते वीजनिर्मिती करणाऱ्या संचापर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. हे ऑडिट यापूर्वीच व्हायला हवे होते. मी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशा सूचनाही केल्या होत्या; मात्र सर्जवेलला गळती लागल्यानंतर हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे, असे मोडक यानी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.