Karad, 21 May : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले व अन्य उमेदवारांनी आज गुरुवारी (ता. २१ मे) उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केले. मात्र त्यानंतर घडलेल्या एका राजकीय घडामोडीने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale), डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बाजार समितीत जाऊन चहापान घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Krishna Sugar Factory Election) उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना सत्ताधारी गटाकडून राजकीय बेरजेचे प्रयत्न अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. सध्या कारखान्यातील सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले आणि भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटामध्ये थेट लढत रंगण्याचे चित्र आहे.
प्रत्येक मतदारसंघातील राजकीय प्रभाव, स्थानिक नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर उंडाळकर गटाला सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आजच्या भेटीनंतर त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान ॲड. उंडाळकर स्वतः उपस्थित नसले तरी बाजार समितीचे संचालक, माजी सभापती विजयकुमार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.
अनेक वर्षांनंतर भोसले गटाची बाजार समितीतील उपस्थिती ही केवळ सौजन्य भेट नसून त्यामागे राजकीय संदेश असल्याची चर्चा सुरू आहे. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाच्या नव्या अध्यायाची नांदी म्हणून याकडे पाहिले जात आहे. आगामी काही दिवसांत या हालचालींचे स्पष्ट राजकीय रूप समोर येईलच.
चहापान की राजकीय संकेत?
कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील झालेल्या या चहापानाने केवळ औपचारिक भेटीपलीकडील संदेश दिल्याची चर्चा आहे. भोसले आणि उंडाळकर हे दोन प्रभावी राजकीय प्रवाह अनेक वर्षांनंतर एका चौकटीत दिसल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
भोसले यांच्या भेटीच्या वेळी उंडाळकर प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले स्वागत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही भेट यामुळे पुढील काळात सहकार क्षेत्रात नवे समीकरण दिसेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.