पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक नेते गुप्त बैठका घेऊन आघाड्या मजबूत करण्याच्या तयारीत आहेत.
या वेळी नगराध्यक्षपद पहिल्यांदाच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सत्तेची समीकरणे बदलली असून, दिग्गजांना निराशा झाली आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यातील जुनी स्पर्धा पुन्हा रंगणार असून, कऱ्हाडकर या वेळीसुद्धा निर्णायक ठरतील, अशी चर्चा आहे.
Satara, 17 October : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या राजकारणाची खलबते जोर धरू लागली आहेत. इच्छुक गोपनीय बैठकांमध्ये तसेच जागा निश्चितीची गोळाबेरीज करण्यात मग्न आहेत. या घडामोडीत आघाड्यांची बांधणी करण्यासाठी प्रस्थापित मात्र आघाडीवर आहेत. पारंपरिक विरोधक असलेले राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या भूमिकावर अनेक ठिकाणच्या लढती ठरणार आहेत.
पाचगणी (Panchgani) नगरपालिकेसाठी पक्ष, आघाड्यांना कधीही मतदारांनी थारा दिला नाही. अपक्ष लढून त्यानंतर आघाडी करून सत्ता स्थापन करण्याची येथे परंपरा आहे. गेली पाच वर्षे सत्तेविना कारभार चालू असल्याने आपला पूर्ण वेळ प्रस्थापितांनी वेट ॲण्ड वॉचमध्ये आणि आडाखे बांधण्यात घालवला आहे.
रस्त्यावर उतरून एकाही माजी पदाधिकाऱ्यांनी मतदार आणि जनतेची दुःख अथवा समस्या जाणून घेतल्या नाहीत, ही शोकांतिका आहे. सर्व राजकारणी या काळात अज्ञातवासात होते. निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे सुज्ञ मतदार याचा जाब आता या निवडणुकीत विचारणार, हे नक्की.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसीसाठी राखीव झाल्याने या उमेदवारांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे ज्यांनी नगराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकले होते, त्यांची पूर्ण निराशा झाली आहे. त्यामुळे या इच्छुकांना आता नगरसेवकपदासाठी मतदारसंघ शोधून दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.
बऱ्याचदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीनंतर खालच्या सत्तेची गणिते ठरली जातात; परंतु यावर्षी उलटे घडणार असून, नगरसेवकांवर नगराध्यक्षपदाची वाटचाल राहणार आहे. हे नक्की. पाचगणी नगरपालिका ताब्यात घेण्याचे प्रस्थापितांचे मनसुबे आरक्षणामुळे धुळीला मिळविले आहेत. या घडामोडीत आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दिग्गज गोपनीयरित्या आघाडी बनवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार असल्याच्या हालचाली आहेत.
नगराध्यक्षपद पहिल्यांदाच ओबीसीसाठी राखीव झाल्याने या प्रवर्गातील समाजात चुरस निर्माण झाली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. त्यांचे नेतृत्व जर एखाद्या अनुभवी व्यक्तीने घेऊन मैदान आखल्यास यश मिळणार आहे, अन्यथा वेगळे चित्र पाहायला मिळेल.
मंत्री मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या आधिपत्याखाली आणि शेखर कासुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची मूठ प्रत्येकवेळी बांधली जात आहे; परंतु त्याला यश येताना दिसत नाही. त्यांच्या वज्रमुठीवर लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी प्रत्येकवेळी घणाघात करून यशस्वी झाल्या आहेत. या वेळी त्यांना नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी केली असली, तरी आता कऱ्हाडकरांना ही निवडणूक सोपी ठरणार आहे. कारण, नगराध्यक्षपदाचा भार कमी झाल्याने त्यांना ताकदीने सर्व प्रभागांवर लक्ष देता येणार आहे.
मंत्री मकरंद पाटील यांना यावेळी नगराध्यक्षपदासाठी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यांची भूमिका आणि शेखर कासुर्डे यांचा चाणाक्षपणा यावेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेकांनी आपली उमेदवारी निश्चित केली असली, तरी मतदार आणि असणाऱ्या परिस्थितीवर गट आणि नेता निवडून मैदानात उतरावे लागणार आहे. तरीही यावेळीच्या निवडणुकीत लक्ष्मी कऱ्हाडकर या किंगमेकर ठरतील, असा अंदाज आहे.
पाचगणी पालिका क्षेत्रात माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, लक्ष्मी कऱ्हाडकर, साहेबराव बिरामणे, शेखर कासुर्डे, दिलीप बगाडे, प्रवीण बोधे, परवीन मेमन, गॅब्रिएल फर्नांडिस यांच्या राजकीय भूमिका महत्त्वाच्या ठरतात. खालच्या फळीत नारायण बिरामणे, हरीश गोळे, प्रकाश गोळे, शरद कासुर्डे, विनोद बिरामणे, संजय कासुर्डे, अजित कासुर्डे, सुनील बगाडे, सुनील कांबळे, रूपेश बगाडे, मेहूल पुरोहित, दत्ता दुधाणे, नीलेश महाडिक, प्रसाद कारंजकर, शहानवाज चौधरी, राजश्री सणस, सुनीता कासुर्डे, नामदेव चोपडे, महेश खांडके, किरण पवार या नावाभोवती यावेळचे मैदान फिरणार आहे.
महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढणार?
राज्यात सध्या महायुतीची सत्ता असल्याने ही नगरपालिका मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील असल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे. महायुतीतील शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. भाजपने उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार का? हा प्रश्न आहे.
कऱ्हाडकर महाआघाडीतील घटक पक्षांना घेऊन आव्हान निर्माण करतील का? यावर या वेळची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत भाजपने चिन्हावर निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांना उमेदवार शोधावे लागले होते. त्यामुळे या वेळी त्यांची भूमिका काय असेल, हे पाहावे लागेल. असे असले तरीही अपक्षच यात सरस ठरतील, असे चित्र आहे.
Q1. पाचगणी नगराध्यक्षपद यावर्षी कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
यावर्षी नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
Q2. पाचगणीत पारंपरिक मतदान पद्धत कशी आहे?
मतदार पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांना पसंती देतात आणि नंतर आघाडी करून सत्ता स्थापन होते.
Q3. निवडणुकीतील प्रमुख नेते कोण आहेत?
मकरंद पाटील, लक्ष्मी कऱ्हाडकर, शेखर कासुर्डे आणि नानासाहेब कासुर्डे हे प्रमुख नेते आहेत.
Q4. या वेळची निवडणूक का महत्त्वाची मानली जाते?
महायुती सत्तेत असून ही नगरपालिका मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.