पुणे : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. त्यांच्या आठवणींना सर्वच स्तरातून उजाळा मिळत आहे. लतादीदींनी आपल्या आयुष्यातील पहिलं क्लासिकल गाणं ता. ९ सप्टेंबर १९३८ रोजी सोलापूर येथे गायले होते. याबाबतची आठवण त्यांनी २९ मार्च २०२१ रोजी स्वतः ट्विट करून दिली होती. ती आठवण आज पुन्हा ताजी झाली आहे. (Lata Mangeshkar sang the first classical song in Solapur)
लता मंगेशकर यांचं मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात आज (ता. ६ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबीयांसोबतच संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जगभरातील त्यांच्या चाहत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येत आहेत.
दरम्यान लतादीदींनी गायलेली गाणी आणि त्यांच्या संदर्भातील आठवणी देशभरातील नागरिकांकडून पुन्हा जागृत केल्या जात आहेत. अशीच एक आठवण म्हणजे लता मंगेशकर यांनी २९ मार्च २०२१ रोजी स्वतः ट्विट करून दिलेल्या जुन्या फोटोची आहे. ती आठवण म्हणजे लता मंगेशकर यांनी सोलापुरात ९ सप्टेंबर १९३८ रोजी गायलेले पहिले क्लासिकल गाणं. तेथील एक खास फोटोही त्यांनी ट्विट केला होता.
त्या ट्विटमध्ये लतादीदींनी म्हटले होते की, आमचे परिचित उपेंद्र चिंचोरे यांचा आज फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की, मी माझा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स माझ्या वडिलांसोबत (मास्टर दिनानाथ मंगेशकर) ता. ९ सप्टेंबर १९३८ रोजी सोलापुरात सादर केला होता. हा फोटो त्यावेळी प्रसिद्धीसाठी काढला होता. विश्वास बसत नाही की गाणे गाता गाता कधी ८३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
लतादीदींचे वडिल मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे सोलापुरातल्या भागवत चित्र मंदिरात ता. ९ सप्टेंबर १९३८ रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी भागवत चित्र मंदिराचे सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. लतादीदींनी याच कार्यक्रमात एक रचना राग खंबावतीमध्ये गायली होती. तसेच, वडिलांच्या लोकप्रिय मराठी नाटकातील एक गाणेही गायले होते. त्यांच्या गायनाला श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली होती. त्यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनीही त्यावेळी त्यांचे कौतुक केले होते. ही आठवण खुद्द लतादीदींनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.