Ajit Pawar-Laxman Dhoble-Manohar Sapate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : सोलापुरातील दोन शरदनिष्ठांचा अजितदादांवर हल्लाबोल; एकाने पक्ष सोडला, दुसऱ्याची पवारांकडे उमेदवारीची मागणी

Assembly Election 2024 : सोलापूरमधील दोन नेत्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले. अजितदादांवर टीकास्त्र सोडत एकाने पक्ष सोडला, तर अजित पवारांनी विधानसभेचे तिकिट कापल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 October : सोलापूरमधील दोन नेत्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले. अजितदादांवर टीकास्त्र सोडत एकाने पक्ष सोडला, तर अजित पवारांनी विधानसभेचे तिकिट कापल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शरदनिष्ठ मानले गेलेल्या या दोन नेत्यांनी एकाच दिवशी अजित पवारांवर हल्लाबोल करत न्यायाची मागणी शरद पवारांकडे केली आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी आज तब्बल दहा वर्षांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांना कंटाळूनच आपण भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आपण शरदनिष्ठ असल्यानेच 2014 च्या निवडणुकीत अजितदादांनीच माझे तिकिट कापून महेश गादेकर यांना दिले, असा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनाच टार्गेट केले होते. पुन्हा शरद पवारांच्या जवळ जाताना अजित पवारांवरच हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील आमदाराला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी जी अडचण होते. ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगून मी भाजपचा राजीनामा देणार आहे.

अजित पवारांना मोकळं वातावरण लागतं. त्यांच्या वयाची माणसं त्यांच्याबरोबर असावी लागतात. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना माहिती संकलन करायची आहे, त्यासाठी त्यांना स्वतःची टीम तयार करायची आहे.

माझं आणि त्यांच्या असं काही विशेष घडलं नाही. पण, त्यांना असं वाटतंय की फळ असणाऱ्या झाडावर पक्षी येतात. त्यांना मी धरून ठेवेन. माझ्याकडे हात ओले करण्याची जी दानत लागते, ती माझ्याकडे आहे, या आत्मविश्वासाच्या बळावर ते राजकारण करतात, असा टोला ढोबळे यांनी अजित पवारांना लगावला.

पण, तसं राजकारण करता आलं असतं, तर त्यांच्या काकांनी आयुष्यभर तेच केले असते. त्यांना माझ्यासारखे गरीब आणि निष्ठावान लोक धरून ठेवायची गरज वाटली नसती. शरद पवार यांनी नेहमी चांगुलपणाने सात्विक राजकारणाने सर्वांना जवळ केले. जीव लावला आणि स्वामीनिष्ठनेचे राजकारण करणाऱ्यांना मनापासून साथ दिली, अशा शब्दांत ढोबळेंनी शरद पवारांचे कौतुक केले.

अजित पवारांसारख्या माणसाला नको आपला सहवास म्हणून त्यांना कंटाळूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलो होतो. पण, भाजपमध्ये आल्यानंतरही माझी ओढाताणच झाली. कारण अजित पवार तिथेही आले. हे लक्षात आल्यानंतर आयुष्याची शेवटची वर्षे सुखाने घालवण्यासाठी घरवापसीचा निर्णय घेतला आहे, असे ढोबळेंनी नमूद केले.

मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांनीही अजित पवारांमुळेच आपल्यावर आतापर्यंत अन्याय झाला. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्यावर अजितदादांकडून वारंवार अन्याय करण्यात आला, असा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.

माझ्यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामुळे अन्याय  झाला आहे. शरदनिष्ठ असल्यानेच त्यांच्याकडून हा अन्याय केला गेला, त्यामुळेच मला  मिळालेला एबी फॉर्म काढून ऐनवेळी महेश गादेकर यांना देण्यात आला, असा आरोपही सपाटे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT