Komal Dhoble-Salunke
Komal Dhoble-Salunke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लक्ष्मण ढोबळे-मंगळवेढ्यातील दुरावलेले संबंध कन्येने पुन्हा जुळवले!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) आणि मंगळवेढेकर यांच्यातील दुरावलेले संबंध तब्बल १६ वर्षांनंतर त्यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंके यांनी जुळविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी त्यांनी मोफत महाआरोग्य शिबिराची संधी साधली. (Laxman Dhoble's daughter Komal Dhoble-Salunke active in Mangalvedha taluka)

मूळचे अक्कलकोटचे असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने राजकारणात मोठी मजल मारली. त्यांनी आपल्या लाघवी वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला मोहिनी घातली. राजकीय वारसा नसतानादेखील त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. तब्बल २५ वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष्मण ढोबळे यांनी काम केले. सुमारे 2004 पर्यंत मंगळवेढ्याचे आमदार होते. मंगळवेढ्यात साहित्य संमेलन व विविध नामवंत वक्त्यांना आणून त्यांच्या बौद्धिक ज्ञानाची मेजवानी त्यांनी नागरिकांना दिली. मात्र, 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ढोबळे यांच्याऐवजी डॉ. रामचंद्र साळे यांना संधी दिली.

लोकप्रतिनिधी आणि मंगळवेढ्याची जनता यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये 2004 पासून दुरावा निर्माण झाला. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नीचाही मोठ्या मताने पराभव झाला. त्यामुळे ढोबळे आणि मंगळवेढ्यातील जनतेमधील अंतर वाढतच गेले. सध्या ते भारतीय जनता पक्षात असून त्यांच्याकडे जनसंपर्काचे तसे कोणतेही पद नाही. त्यामुळे सध्या ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला गेल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषद या संघटनेची जबाबदारी त्यांनी कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांच्यावर सोपवली. कोमल यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सावली फाउंडेशन व शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले. सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा ढोबळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोरोनासारख्या महामारीचा सामना करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील विविध आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात कोरोना लसीकरणासह मोफत उपचार, औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधा नामवंत डॉक्टराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. शिबिरात 5 हजार 657 रुग्णांवर मोफत उपचार करत औषधांचेही वाटप करण्यात आले.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे स्वतः हजर राहून रुग्णांची व वयोवृद्धांची विचारपूस करत होते. त्यांच्या सोबतीला महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे, क्रांती आवळे होते. त्यामुळे तब्बल 2004 पासून ढोबळे आणि मंगळवेढच्या जनतेमध्ये दुरावलेले संबंध महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने पुन्हा जुळले. माजी मंत्री ढोबळे यांच्या राजकीय काळातील सहकारी भेटल्यामुळे ते संबंध या शिबिराच्या निमित्ताने आणखीन घट्ट झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT