Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: मुश्रीफांच्या 'या' विधानाचा अर्थ काय घ्यायचा ? 'महायुती'सोबत ठाकरे गटाला गोंजारणे सुरूच

Kolhapur Loksabha Election: हसन मुश्रीफ यांच्या विधानाने महायुतीतील नेते संभ्रमात

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीचाच उमेदवार आम्ही निवडून देऊ, अशी वक्तव्य सातत्याने करत आहेत. पण दुसरीकडे त्यांची भूमिका कार्यकर्त्यांसह महायुतीतील पदाधिकारी आणि नेत्यांना संभ्रमात टाकणारी आहे.

नुकतेच कागल तालुक्यात झालेल्या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे याचा अर्थ काय घ्यायचा ? अशी विचाराण्याची वेळ आली आहे.

कागल वंदूर येथे विविध विकासकामाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी बोलताना येणाऱ्या सर्व निवडणुकांत एकत्र राहून काम करणार आहोत, अशी शपथ मी व संजय घाटगे यांनी घेतली आहे. आमच्या मैत्रीला कोणाची दृष्ट लागू नये,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री मुश्रीफ यांनी घाटगे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर महायुतीत वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुश्रीफ म्हणाले, 'संजय व मी कॉलेज जीवनात जीवलग मित्र होतो. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर एकत्र आलो. सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण यांच्या आयुष्यात समृद्धी आणणे, हेच आमचे ध्येय आहे. यासाठी दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहे', असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

तर संजय घाटगे म्हणाले, 'मंत्री मुश्रीफ सकाळी साडेपाचपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामे करत असतात. गेली पंचवीस वर्षे त्यांचे या कामात सातत्य आहे. माझ्यासारखा माणूस थकला असता. मात्र, ते उत्साहाने हे सर्व करत आहेत. त्यांच्यासारखा नेता राज्यात नाही. विरोधक असूनही त्यांनी अन्नपूर्णा साखर कारखान्याला मदत केली. कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची नक्कीच आम्ही परतफेड करू. त्यांना चांगले आयुष्य लाभो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो'.

वास्तविक पाहता कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपचे समरजितसिंह घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. यंदाही समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात मतांनी घाटगे यांना पराभव स्वीकारावा लागला.

मात्र मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांची मैत्री पाहता मत विभाजणासाठी संजय घाडगे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचाच फटका समरजीत सिंह घाटगे यांना बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची बेरीज करून व महायुतीतील आपले स्थान ठेवत मंत्री मुश्रीफ हे ठाकरे गटाला गोंजारत असल्याचे दिसते.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT