Kolhapur Political News : हसन मुश्रीफ महायुतीत गेल्यानंतर कागलच्या राजकारणात भाजपचे समरजितसिंह घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात जुंपली होती. तो वाद शांत होत असताना पुन्हा एकदा कागलच्या राजकारणात प्रॉपर्टीकार्डच्या श्रेयवादावरून वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. कसबा-सांगाव परिसरातील वाडदे धरणग्रस्तांवरून पुन्हा एकदा सोशल वॉर सुरू झाले आहे.
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला घाटगे गटाने त्याच शब्दात उत्तर दिल्याचे चित्र आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गावे गेल्याने धरणग्रस्त झालेल्या राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील वाडदे व वाकी या दोन्ही वसाहतींचे कागल तालुक्यातील कसबा-सांगाव या गावांमध्ये पुनर्वसन झाले आहे. सरकारने त्यांना घरांच्या जागा आणि शेतजमिनीही दिल्या.
परंतु, त्यांच्या स्वतःच्या नावाने शेत जमिनीचे सातबारा उतारे तयार होत नव्हते. यासाठी मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे (Samarjitsingh Ghatge) हे दोघेही पाठपुरावा केल्याचे दावे करत आहेत. नुकतेच मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून कसबा-सांगाव ता. कागल (Kagal) येथील वाडदे धरणग्रस्त वसाहतीमधील धरणग्रस्तांच्या स्वमालकीच्या हक्काच्या सातबारा उताऱ्यांचा विषय कायमचा निकालात निघाला आहे.
या वसाहतींमधील शंभरहून अधिक धरणग्रस्त कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या स्वमालकीच्या शेतजमिनींचे सातबारा उतारे मिळणार आहेत, असा मेसेज समाज माध्यमात वायरल झाला. मुश्रीफ यांनी प्रयत्न आणि पाठपुरावा करून मंत्रालय स्तरावर बैठक लावून प्रयत्न केले. त्यानंतर या वाडदे वसाहतीतील शंभरहून अधिक कुटुंबांचा हा प्रश्न आता कायमचा निकालात निघणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानिमित्ताने वाडदे धरणग्रस्त वसाहतीमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सातबारा उतारे नावावर होण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर मुश्रीफ यांचा सत्कार केला. दरम्यान, या प्रकरणानंतर घाटगे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन या वसाहतीतील प्रॉपर्टीकार्ड मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते.
या प्रश्नासाठी मी गेल्या 25 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. तो मार्गी लागल्याचा आनंद मला आहे, अशी प्रतिक्रिया घाटगे यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणावरून घाटगे आणि मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाडदे येथील ग्रामस्थांनी घाटगे यांची भेट घेऊन त्यांचाही सत्कार केला.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.