Stock Market Fraud
Stock Market Fraud Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : एवढे पैसे कोठून आणले म्हणून इन्कम टॅक्स तुमचीच चौकशी करेल : फसवणूक झालेल्या महिलांना नेत्याची दमबाजी

सरकारनामा ब्यूरो

इस्लामपूर (जि. सांगली) : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) लाखो रुपये गुंतवलेल्या कडेगाव (Kadegaon) तालुक्यातील महिलांनी एकत्रित येत नेर्लेतील एका एजंटाला गाठले आणि सर्वांसमोर खरडपट्टी काढली. आक्रमक झालेल्या या महिलांसमोर त्या एजंटाची बोबडी वळली. मात्र, त्या वेळी एजंटाच्या समर्थनार्थ आलेल्या एका स्थानिक नेत्याने (Leader) एजंटाची बाजू घेत महिलांची व स्थानिक गुंतवणूकदारांची उलटतपासणी केली. ‘एवढे पैसे कोठून आले,’ असे म्हणत ‘प्राप्तिकर विभाग (Income Tax) तुमचीच चौकशी करेल,’ असे सांगून महिलांना उपदेशाचा डोस पाजला. यावर शिव्यांची लाखोली वाहत ‘देव बघून घेईल,’ असे म्हणत महिला निघून गेल्या. (Leader threatened the women who were cheated in the stock market)

शेअर मार्केटमध्ये नेर्लेतील अनेकांनी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या परताव्याबाबत गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता, त्यांनाच प्राप्तिकर विभागाकडून तपासणी होण्याची भीती घालत विषय बंद करा, असा निरोपच स्थानिक म्होरक्याकडून दिला जात आहे. पोलिसांत तक्रार केल्यास नागरिकांना गंडा घालून आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुंतवणुकीची रक्कम अधिक असल्याने केलेल्या उचापतीचा भांडाफोड होण्याच्या भीतीने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून ही नामी शक्कल काढल्याने पोलिस ठाण्याच्या वाटेवर असणारे अनेकजण पुन्हा मागे फिरल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मोठ्या आर्थिक लालसेच्या हव्यासापोटी कडेगाव तालुक्यातील अनेक व्यावसायिक, राजकीय पुढऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यासंबंधी म्होरक्यानेच पैसे घेऊन पोबारा केला आहे. शेअर मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक झाली, नेमक्या किती लोकांची फसवणूक झाली आहे, याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार झाल्यानंतरच उघड होणार आहे.

फसवेगिरीत नेत्यांचाही हात

कडेगाव तालुक्यातील दोन व्यक्तींनी मुंबईपाठोपाठ इस्लामपुरातही दिमाखदार कार्यालय थाटले होते. या दोघांनी तालुक्यातील दुसऱ्या फळीतील राजकीय नेत्यांना हाताशी धरून मध्यस्थामार्फत सावज हेरले. अनेक जणांनी बँका, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, सोने गहाण ठेवून ही रक्कम त्याच्यामार्फत नोटरी करून दिली. आज रोजी ती व्यक्तीच कार्यालय बंद करून पसार झाली आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने हे गुंतवणूक करणारे तोट्यात गेले आहेत.

‘न घाबरता तक्रार करा’

शेअर मार्केटमध्ये कोणाची फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी न घाबरता पोलिस आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी. तांबवे, बहे, नेर्ले, कामेरी, पेठ, बोरगाव या गावांतील नागरिकांनी कमी रक्कम असेल, तर इस्लामपूर पोलिस ठाणे व मोठी रक्कम असेल तर आर्थिक गुन्हे शाखा सांगलीत तक्रार दाखल करावी, असे आवाहन सांगली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT