Solapur Leader Meet Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : गोरेंचा गणपती सोलापूर जिल्हा बॅंकेचे इच्छुक, नेतेमंडळींना पावणार; आजी-माजी आमदार, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बोराटवाडीत हजेरी...

DCC Bank Election 2026 : सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालक व इच्छुक नेत्यांनी बोराटवाडी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. 88 मध्ये अडकलेल्या नेत्यांबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक सध्या रणधुमाळी सुरू आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी संचालक तथा बॅंकेवर पुन्हा जाण्यासाठी इच्छूक असलेल नेतेमंंडळींनी बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) येथील निवासस्थानी जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. आता गोरे यांचा गणपती जिल्हा बॅंकेवर जाण्यासाठी इच्छूक असलेले आणि 88 मध्ये अडकलेल्या नेतेमंडळींना पावणार का, याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. 21 सप्टेंबर) प्रारुप मतदार यादी जाहीर होणार असून 14आक्टोंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वीच राजकीय घडामोडी आणि भेटीगाठींना वेग आला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी बोराटवाडीत हजेरी लावून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, शहाजीबापू पाटील, राम सातपुते, दीपक साळुंखे, महापौर श्री. विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा समावेश होता.

याशिवाय जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, रोहिणी तडवळकर, गणेश चिवटे यांनीही गोरे यांच्या बोराटवाडीतील घरी हजेरी लावली.

जयकुमार गोरे यांच्या घरी श्री गणेशाच्या दर्शनासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये अनेक जण हे सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी संचालक आहेत. त्यांच्यावर सहकार कलम कायदा 88 अन्वये जिल्हा बॅंकेच्या नुकसानीच्या वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 88 ची कारवाई ही त्यांना जिल्हा बॅंकेत पुन्हा जाण्यात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. तसेच, सलग 10 वर्षे संचालक असल्यास निवडणूक लढविण्यास बंदी अशा नियमांच्या जंजाळ्यात अडकलेली डीसीसीतील एन्ट्री सुकर व्हावी, यासाठी या नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील या माजी संचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सरू असल्याचेही सांगितले जात आहे.

सोलापुरात झालेल्या महायुतीच्या नेतेमंडळींच्या बैठकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ज्यांनी कर्ज घेऊन फेडले नाही, त्यांच्याकडून वसुली करा. पण आम्ही गुन्हाच केला नसेल तर आमचा वसुलीशी काय संबंध. ज्यांनी कर्ज फेडले नाही त्यांच्याकडून वसूल करा. पण आम्हाला मोकळे करा, आम्हाला निवडणूक लढवायची, अशी मागणी केली होती. आता त्यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे आहे. त्यासाठी गोरे यांच्या घरातील श्रीगणेश सर्वांना पावणार का, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT