Solapur, 04 August : अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यात निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहित अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा.
भौगोलिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या ठिकाणी हे अप्पर तहसील कार्यालय करावे, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या या भूमिकेवर मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील गटाची काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.
मोहोळ तहसील कार्यालयाचे विभाजन करून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय (Angar Upper Tehsil Office) मंजूर करण्यात आले आहे. अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयास सर्वपक्षीय नेतेमंडळींना विरोध दर्शविला होता. मोहोळमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच, आमदार यशवंत माने (Yashwant Mane) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले होते.
अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. उमेश पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्यामध्ये तर ‘अरे तुरे’ची भाषा झाली होती. एकाच पक्षात असूनही उमेश पाटील आणि यशवंत माने यांनी एकमेकांची वैयक्तीक उणीदुणी काढली होती.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फेरसर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. मात्र, अनगरचे अप्पर तहसील कार्यालय अजूनही रद्द झाले नाही. त्यामुळे शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावरून डीपीसीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच आमदार यशवंत माने आणि चवरे यांच्यात हमरी तुमरी झाली. चवरे यांच्या मदतीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, तर आमदार मानेंच्या मदतीला किसन जाधव आले होते.
अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या वादात आता खासदार प्रणिती शिंदे यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. अनगरचे अप्पर तहसील कार्यालयाचा फेरविचार करण्यात यावा. तसेच भौगोलिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या ठिकाणी हे कार्यालय करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे.
प्रणिती शिंदेंनी पत्रात काय म्हटले आहे
मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात कुरुल, कामती आणि बेगमपूर अशी मोठी बाजारपेठांची गावे आहेत. या परिसरातील गावांना मोहोळ तहसील कार्यालय खूप दूर आणि अडचणीचे ठरते आहे. दक्षिण मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यरत आहे.
त्याच धर्तीवर मोहोळच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती असणाऱ्या बेगमपूर अथवा कुरुल या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. पण हे अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर झाले आहे.
अनगर येथील मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या योग्य नसून मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी हे गैरसोयीचे आहे, त्यामुळे या भागातील जनतेमध्ये या निर्णयावरून नाराजी आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी मला त्याबाबतचे निवेदन दिले आहे.
महसूल विभागाने अनगर येथे मंजूर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर अशा ठिकाणी मोहोळ तालुक्याचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे, अशी विनंती प्रणिती शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.