Pandharpur, 11 July : आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केलेले असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि मंत्र्याच्या भूमिकेमुळे वारकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. खासदार संदीपान भूमरे यांनी बुधवारी (ता. १० जुलै) आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन दर्शनबारीत घुसखोरी करून पांडुरंगाचे दर्शन घेतले. आता आषाढी एकादशीला आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना दर्शन मिळावे, यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंढरपूर मंदिर समितीला पत्र दिले आहे. त्यामुळे दर्शनबारीतील वारकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने (Vitthal Mandir Samiti) आषाढी यात्रेत व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) बंद केले आहे. असे असतानाही राज्यातील काही मंत्री आपल्या मर्जीतील अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दर्शन घेणे सोपे व्हावे, यासाठी व्हीआयपी पास देण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आषाढी एकादशी दिवशी आपल्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांतील सात जणांना विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन मिळावे, असे शिफारस पत्र मंदिर समितीला दिले आहे.
दरम्यान, माजी मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे यांनी बुधवारी आपल्या कार्यकर्त्यांसह व्हीआयपी दर्शन घेतल्याचे पुढे आले आहे. एकीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतानाच त्यांच्या पक्षाचे खासदार आणि मंत्री म्हणत व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीकडे आग्रह धरत असल्याचे दिसून येत आहे.
मंत्र्यांच्या या व्हीआयपी दर्शनावरून वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सावळ्या विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी लाखो भाविक पायी पंढरपूरकडे येत आहेत. आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग तीन किलोमीटरपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी 12 ते 13 तास रंगेत उभे राहूनही भाविकांना वेळेत आणि सुलभ दर्शन मिळत नाही. मात्र मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्यकर्त्यांना तत्काळ व्हीआयपी दर्शन दिले जात असल्याचे प्रकारात समोर आले आहेत.
व्हीआयपी दर्शन बंद असतानाही मंत्री, खासदारांकडून व्हीआयपी दर्शनासाठी आग्रह धरला जात आहे. केवळ मंत्री आणि खासदारांकडूनच नव्हे तर मंदिर समिती सदस्यांच्या वतीनेही दररोज वैयक्तिक लाभाच्या आणि समितीच्या देणगीदारांना व्हीआयपी दर्शन घडविले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडूनही रांगेत घुसखोरी करून व्हीआयपी भाविकांना दर्शन दिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.