Sharad Pawar Meet Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pawar-Mohite Patil Meeting : पवारांच्या भेटीनं ‘आमचं ठरलंय’ला बळ; पण मोहिते पाटील माढ्यात ‘धैर्य’ दाखवतील काय?

विजय दुधाळे

Solapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्या मैत्रीची आठवण ठेवत रविवारी (ता. १३ ऑगस्ट) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. पवार तब्बल चार वर्षांनंतर शिवरत्न बंगल्यावर पोचले होते, त्यामुळे शिवरत्न पुन्हा एकदा जुन्या सवंगड्यांनी बहरला होता. पवारांच्या या भेटीमुळे मोहिते पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय...खासदारकीचं’ या मोहिमेला बळ मिळाले आहे. पण, कोल्हापूरच्या सतेज पाटील यांच्याप्रमाणे मोहिते-पाटील माढ्यात लढण्याचे ‘धैर्य’ दाखवतील का?, हा खरा प्रश्न आहे. (Like Satej Patil, will Mohite Patil show 'courage' to fight in Madha?)

माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संबंध अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. विशेषतः रणजितसिंह यांना मिळालेली विधान परिषदेची आमदारकी सोडता मोहिते पाटील यांच्या पारड्यात भाजपकडून तसं भरभक्कम काहीच पडलेले दिसत नाही. खरं तर भाजपत आल्यापासून मोहिते पाटील हे अडगळीत गेल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र, इकडे आड-तिकडे विहिर अशी स्थिती ऐकीकाळी जिल्ह्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या मोहिते पाटील यांची झालेली आहे.

मध्यंतरी भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या. त्यात पश्चिम सोलापूर (माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूरचा काही भाग) धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूक होते. पण, त्याही ठिकाणी मोहिते पाटील यांना डावलून चेतनसिंह केदार-सावंत यांना संधी देण्यात आली. त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. कारण, केदार सावंत यांना संधी देताच मोहिते पाटील गटाकडून ‘आमचं ठरलंय...खासदारकीचं’ अशी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यातून धैर्यशील हे माढा लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचा विरोध लक्षात घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने माढ्याच्या शिंदे बंधूंना गळाला लावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी तर खासदार निंबाळकर यांना दोन लाख मतांनी निवडून आणण्याचे जाहीर केले आहे. त्यापद्धतीने निंबाळकरांनी इतरांनाही हाताला धरण्याचे काम सुरू केले आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी आपल्या जुन्या मित्राला भेटून अनेक गणितं सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. भाजपत होणारी घुसमट दूर करण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केलेले स्वागत हे पाहिले पाऊल होते, असे राजकीय निरीक्षक मानतात. आता तर खुद्द थोरल्या पवारांनी थेट ‘शिवरत्न’वर येऊन विजयदादांची विचारपूस करून मोहिते पाटील यांच्यासाठी दरवाजे उघडे केल्याचे मानले जात आहे.

मध्यंतरी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाने सोशल मीडियात व्हायरल झालेली पोस्ट आणि पवारांची भेट यामुळे मोहिते पाटील-पवार समीकरण पुन्हा सोलापुरात तयार होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पण कोल्हापुरात ज्या प्रमाणे सतेज पाटील यांनी आघाडीच्या विरोधात जाऊन आमचं ठरलं असं म्हणत संजय मंडलिक यांना निवडून आणले होते. त्याप्रमाणे मोहिते पाटील हे माढ्यात लढण्याचे ‘धैर्य’ दाखवतील का, हा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT