Shahu Maharaj-SambhajiRaje-Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : कोल्हापुरात लोकसभेची उमेदवारी राजकीय घराण्यात की नव्या चेहऱ्याला संधी?

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी अथवा महायुतीतून प्रस्थापित घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार की नवख्या चेहऱ्याला संधी देणार, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला आहे. दोन्हीकडे इच्छुकांची मांदियाळी असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही लढण्याची तयारी दर्शवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. (Lok Sabha candidature in Kolhapur is an opportunity for established or newcomers)

दरम्यान, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीकडून सरप्राईज चेहरा रिंगणात असेल, असे वक्तव्य केल्याने हा चेहरा कोण? याविषयीही उत्सुकता ताणली आहे. ऐनवेळी श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज की त्यांचे पुत्र माजी खासदार संभाजीराजे छत्रपती रिंगणात असतील, याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी किंवा महायुतीकोल्हापूरच्या दोन्ही जागा कोणाला जाणार, हेच निश्‍चित नाही. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट एकाही पक्षाकडे सद्यःस्थितीत ताकदीचा उमेदवार नसला तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे बाजीराव खाडे आणि शिवसेनेकडून डॉ. चेतन नरके यांनी लढण्याची तयारी दर्शवली आहे.

या मतदारसंघात काँग्रेसची बाजू भक्कम असल्याने ऐनवेळी ही जागा काँग्रेसला देऊन या जागेवर हक्क सांगणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला राज्यातील अन्य जागा देण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो. काँग्रेसकडे जागा आली तर श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज किंवा संभाजीराजे छत्रपती हे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

हातकणंगले येथे सध्या तरी महाविकास आघाडीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशिवाय पर्याय दिसत नाही. शेट्टी-ठाकरे यांच्या भेटीवर टीका करणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर झालेली कारवाई आणि शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे आमदार सतेज पाटील यांचे वक्तव्य पाहता शेट्टी हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महायुतीतून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची दावेदारी प्रबळ असली तरी त्यांच्यासमोर उमेदवारी मिळवण्याचे आव्हान असेल.

कोल्हापुरात महायुतीकडे ताकदीचा उमेदवार नाही. विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या कामाविषयी नेतेच खूश नाहीत. त्यातून ऐनवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लोकसभा लढण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी तयारी दर्शवली असली तरी यामागे चर्चेत राहणे हाही भाग असू शकतो. भाजपने राष्ट्रवादीवर आरोप करताना पहिल्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार होते, तर त्यानंतर जर कोणावर आरोप केले असतील तर ते मुश्रीफ यांच्यावर होते.

जामिनावर सुटून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नागपूर अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसोबत बसण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. भाजपची ही भूमिका पाहता ते मुश्रीफ यांची उमेदवारी मान्य करतील का? हा प्रश्‍न आहे. पण जनमानसांत कामाच्या जोरावर मुश्रीफ यांची असलेली प्रतिमा आणि त्यांचा काम करण्याचा धडाका, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यातूनच पक्षाने आदेश दिल्यास लढण्याच्या मानसिकतेत ते आहेत. अशा परिस्थितीत दोन्हीही आघाड्यांकडून पुन्हा प्रस्थापित राजकीय घराण्यांमध्ये उमेदवारी दिली जाणार की नव्या चेहऱ्याला पुढे आणणार, याविषयी उत्सुकता असेल.

जागावाटपानंतर चित्र स्पष्ट होणार

सद्यःस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार, हेच स्पष्ट नाही. कोल्हापूरवर शिवसेनेचा दावा कायम आहे. पण, पक्षाची ताकद पाहता त्यात तडजोड शक्य आहे. हातकणंगलेत शेट्टींसह तिरंगी लढत झाली तर विजय मिळवणे अशक्य असल्याने महाविकास आघाडीकडून शेट्टी यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. जोपर्यंत जागावाटप होत नाही; तोपर्यंत या दोन्ही मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार नाही.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT