Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते-पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, सोमवारी 'तुतारी' वाजवणार

dhairyasheel mohite patil resign : मोहिते-पाटील कुटुंबाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता.

Akshay Sabale

भाजपनं रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Election 2024 ) राजकीय उद्रेक झाला आहे. अकलूजच्या मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबानं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोधात दर्शवला होता. पण, भाजपनं कोणताही निर्णय न घेतल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील ( dhairyasheel mohite patil ) यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता धैर्यशील मोहिते-पाटील 'तुतारी' हाती घेणार असून, महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे.

भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला होता. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील आणि रामराजे-नाईक निंबाळकर ( Ramraje Naik Nimbalkar ) यांचे कुटुंबीय करत होते. पण, भाजपनं तशी पावले उचलली नसल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील ( dhairyasheel mohite patil ) यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित मोहिते-पाटलांनी राजीनामा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रात काय म्हटलं?

मा.आ.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य.

विषय : पद व सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्याबाबत..

महोदय, मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तिकेंद्र, सुपर वॉरियर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो व आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती.

दरम्यान, गुरुवारी ( 11 एप्रिल ) धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील घरी भेट घेतली होती. अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे, तर 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माढ्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT