Dhairyasheel Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mane News : महायुतीत धुसफूस? मानेंना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांचा इशारा

Hatkanangle Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्या नावाला पुन्हा पसंती दर्शवली आहे.

Rahul Gadkar

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ( Hatkanangle Lok Sabha Constituency ) भाजप की शिवसेनेला जाणार याबाबत प्रचंड चुरस होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी धैर्यशील माने यांच्या नावाला पुन्हा पसंती दर्शवली आहे. खासदार मानेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोष दाखवण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार मानेंबद्दल नाराजी व्यक्त करत एक प्रकारे जाहीर इशाराच दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

खासदार माने ( Dhairyasheel Mane ) यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एकच स्टेटस झळकवले आहेत. काही दिवसांपूर्वी मानेंनी काँग्रेसचे नेते आणि महाडिक गटाचे राजकीय विरोधक सतेज उर्फ बंटी पाटील ( Satej Patil ) यांचे भर कार्यक्रमात तोंड भरून कौतुक केलं होतं. त्याचाच जाब व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून मानेंना भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय लिहिलंय स्टेटसमध्ये?

"आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब, काही दिवसांपूर्वी आपण एक स्टेटमेंट दिलेलं. 'जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील ( Satej Patil ) यांना दुखवून चालत नाही.' हे आजही आम्ही विसरलेलो नाही. भाजपची मदत घेऊन तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांचे गुणगान गात असाल. तर इथून पुढे हे चालणार नाही. तरच आमच्या दारात मतं मागायला या," अशा शब्दांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टेटसच्या माध्यमातून मानेंना इशारा दिला आहे.

माने नेमकं काय म्हणाले होते?

फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे डॉ.रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण व पी. बी. पाटील सहकारी संस्था उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार उल्हास पाटील आणि राजीव आवळे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार मानेंचे विधान जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या वक्तव्यामुळे खासदार मानेंनी आमदार पाटलांचा धसका घेतला की काय अशा चर्चेला उधाण आलं आहे.

"सतेज पाटलांचं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांची कळ काढून चालत नाही," असं विधान मानेंनी केल्यानंतर सर्वत्र हशा पिकला. मात्र, त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल उपस्थित होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय'चा नारा देत आमदार पाटलांनी महाडिकांविरोधात प्रचार केला. त्यामुळे धनंजय महाडिकांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर, संजय मंडलिक यांचा विजय झाला होता.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT