prakash ambedkar dhairyashil mane raju shetti uddhav thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

Rahul Gadkar

Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ( Hatkanangale Lok Sabha Election 2024 ) शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर ( Satyajit Patil Sarudkar ) यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने ( Dhairyashil Mane ) यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांचा कस लागणार आहे. या मतदारसंघातील ‘वंचित’च्या उमेदवारीने शेट्टी यांची कोंडी झाली आहे; तर सरुडकरांच्या उमेदवारीने निवडणुकीतच रंगत आली आहे.

महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शेट्टी ( Raju Shetti ) यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ठाकरे गटाकडून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ दिली. त्याला शेट्टी यांचा विरोध होता. त्यात उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) सरुडकरांची थेट उमेदवारीच जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचाही भ्रमनिरास झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...अन् शेट्टी महाविकास आघाडीपासून दुरावत गेले

लोकसभेची निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) जाहीर होण्याआधीपासून शेट्टी हे महाविकास आघाडीबरोबर असतील, असे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात होते. शेट्टींनीही पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंसह अन्य नेत्यांची भेट घेतली. पण, 'मशाल' चिन्हावर लढा असाच आग्रह ठाकरेंचा होता. 'मशाल'वर लढल्यास 'स्वाभिमानी'चं काय करायचे? पुन्हा पक्षीय बंधने नकोत या मानसिकतेतून शेट्टी आघाडीपासून दुरावत गेले आणि शेवटी या मतदारसंघात ठाकरे गटाच्या रूपाने चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

धैर्यशील मानेंविरोधात नाराजी

2019 च्या निवडणुकीत माने विरुद्ध शेट्टी, अशी दुरंगी लढत झाली. पर्याय नसल्याने मानेंच्या मागे भाजपची ताकद उभी राहिली. मराठा कार्ड, तरुण उमेदवार, भाषण कौशल्य आणि महायुतीची ताकद या जोरावर माने विजयी झाले. पण, आता इचलकरंजीतून भाजपबरोबर असलेल्या आवाडे गटानेच मानेंच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे. यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर विधानसभेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते वगळता अन्य कोणी मानेंसाठी झटताना दिसत नाही. त्यातून पाच वर्षांतील कामांमुळे मानेंविषयी नाराजी होतीच, ती आता उघडपणे व्यक्त होत आहे.

कारखानदार शेट्टींचा 'कार्यक्रम' करणार?

ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह घराघरांत पोहाेचवणे महत्त्‍वाचे आहे. त्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यातून सरुडकरांना रिंगणात उतरले आहे. गेल्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टींना अवघे सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते, यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते. ऊसदरावरून शेट्टींविरोधात कारखानदार आहेत. सरुडकर हे थेट कारखानदार नाहीत. त्यामुळे कारखानदार शेट्टींचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी सरुडकर यांना साथ देण्याची शक्यता आहे.

गेल्यावेळचे मताधिक्य राखण्‍याचे शेट्टींपुढं आव्हान

शिराळ्यातील नाईक कारखान्यात सरुडकर यांचे वडील उपाध्यक्ष आहेत. या तालुक्यातील दोन्ही नाईक बंधू सध्‍या महाविकास आघाडीबरोबर आहेत. याशिवाय हातकणंगलेत काँग्रेसचा आमदार तर वाळव्यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मदत सरुडकर यांना मिळेल. 2019 च्या निवडणुकीत शेट्टी यांना या दोन मतदारसंघांतून सुमारे 47 हजारांचे मताधिक्य होते, त्याला सरुडकर यांच्या उमेदवारीने फटका बसणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT