Raju Shetty, Chetan Narke
Raju Shetty, Chetan Narke  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 News : हातकणंगलेत नरके की शेट्टी, वंचितमुळे गणित फिस्कटलं !

Rahul Gadkar

Sangali News : सांगली लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचा उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. उर्वरित 16 जागांवर उमेदवारी घोषणा केली असून, हातकणंगलेसह अन्य पाच ते सहा जागांवर उमेदवारीचा घोळ कायम आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्यावरून मतप्रवाह असल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच वंचितनेदेखील महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याने सर्वच गणित फिस्कटल्याचे चित्र आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी शिवसेना अशी लढत झाली होती. स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीकडून हाजी असलम सय्यद आणि युतीकडून धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या वेळी वंचित बहुजन आघाडीची निर्णायक मते विभागल्याने त्याचा फटका शेट्टी यांना बसला होता. (Lok Sabha Election 2024 News)

सध्याच्या घडीला राज्याचे राजकारणात झालेले बदल पाहता शिवसेनेतील फुटीर नेत्यांना धडा शिकवण्याचा इरादा ठाकरे गटाचा आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना सोबत घेऊन धैर्यशील माने यांना पराभूत करण्याचा डाव ठाकरे गटाचा होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत येत नसल्याने आता शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे गटाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून तयारी केलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्यासमोर हातकणंगलेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासोबत दोन माजी आमदार यांचे नावदेखील चर्चेत आहे. शेट्टी सोबत येत नसल्याने ठाकरे गटाकडून चेतन नरके यांना हातकणंगलेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चर्चा डॉ. नरके यांच्यासोबत झाली आहे.

येत्या दोन दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. नरके यांना उमेदवारी दिल्यास पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांतून त्यांचा जनसंपर्क असल्याने त्या ठिकाणाहून मताधिक्य मिळेल, असा अंदाज आहे. शिवाय शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बळ त्यांच्या पाठीमागे उभा राहील, असा शब्द राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून मिळाल्याची ही माहिती आहे, तर हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजीमधूनही माजी आमदार यांची ताकद नक्की यांच्या बाजूने राहील. त्यामुळे नरके यांनी ही उमेदवारी स्वीकारावी, असा प्रस्ताव नरके यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या दोन दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टीसोबत येत नसल्याने ठाकरे गटाचा हा निर्णय होणार आहे यावर एकमत आहे. मात्र, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी आल्यास त्याचा फायदा ठाकरे गटाला होईल, असाही अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी 'एकला चलो'चा नारा दिल्याने महाविकास आघाडीचे गणित सध्याच्या घडीला बिघडले आहेत. त्यामुळे डॉ. चेतन नरके काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महायुती आघाडीमधील घटक पक्ष रयत क्रांती संघटना ही हातकणंगलेच्या जागेवरून आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी पक्षाचे रघुनाथदादा पाटील हेदेखील हातकणंगलेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रस्थापितविरुद्ध विस्थापित लढाई अधिक तीव्र करणार असल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (SaDabahu Khot) यांनी केली आहे.

एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरून शेतकऱ्यांची मत विभागणीचे प्रयत्न होणार आहे. शिवाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला असला तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ते उमेदवार देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांतच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) उमेदवार कोण असतील हे स्पष्ट होईल. मात्र, वंचितच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे (MVA) गणित फिस्कटले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT