सांगली : 13 मार्च | सांगली लोकसभा मतदारसंघात ( Sangli Lok Sabha Constituency ) भाजपमधील गटबाजी व खासदारांच्या कारभाराविरोधात असलेल्या नाराजीच्या लाटेवर विशाल पाटील ( Vishal Patil ) काँग्रेसकडून स्वार होत असताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेने सांगलीतून चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांच्या उमेदवारीची घोषणा केली. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या एका नेत्यावर याचे खापर फोडले. काँग्रेसला ही जागा जर मिळाली नाही तर विशाल पाटील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, 2014 च्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघातून संजयकाका पाटील लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. काही दिवसांत आचारसंहितादेखील लागणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार चारशे पार'चा नारा दिला आहे. त्यांना रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत संघर्ष चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा (उबाठा). पण, हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला हवा आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढविणार आहेत. शिवसेना सहजासहजी हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. पण, सोडला तर त्यांनी अट घातली ती म्हणजे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्या. त्यादृष्टीने चर्चेची पावले पडू लागली. सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून मतदारसंघात सुरू झाली. त्यामध्येच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी ( 11 मार्च ) शिवसेनेत प्रवेश केला. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे ( Uddha Thackeray ) यांनी चंद्रहार पाटील या मर्द पैलवानाला दिल्लीत पाठवा, असे आवाहन केले. याचा अर्थ शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार, असाच झाला.
सध्या काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 2019 च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात चूक झाली, तीच चूक पुन्हा काँग्रेस 2024 मध्ये करणार अशी शक्यता निर्माण झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विशाल पाटील ( Vishal Patil ) निवडणूक रिंगणात उभारणार होते, तयारी सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी जागावाटपात हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला गेला. विशाल पाटील यांना 'हात' ऐवजी 'बॅट' चिन्हावर लढावे लागले. पण, मतदारसंघात हे चिन्ह पोहाेचेपर्यंत निवडणूक संपली, तरीदेखील सव्वा तीन लाख मते विशाल पाटील यांनी घेतली. आता 2024 मध्ये जागावाटपावरून पुन्हा सांगली टार्गेट झाली. काँग्रेसचे नेते जागा सोडणार नाहीत, अशी ग्वाही देत आहेत, पण शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करत असल्याने जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी थेट महाविकास आघाडीतील एका नेत्यावर टीका केली. या नेत्याच्या सांगण्यावरून चंद्रहार पाटील राजकारणात पावले टाकत असल्याचा संशय यांनी व्यक्त केला आहे. मात्र, काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत जी चूक केली ती चूक पुन्हा 2024 च्या निवडणुकीत होऊ लागली आहे. विशाल पाटील यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघात गाठीभेटी घेतल्या आहेत. विविध कार्यक्रमाचे पण आयोजन त्यांनी केले आहे. पण, ही जागा शिवसेनेला गेली तर विशाल पाटील काय भूमिका घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशाल पाटील काँग्रेस सोडणार की विधानसभेला लढणार
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. ही जागा शिवसेनेला मिळाली तर विशाल पाटील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वास्तविक विशाल पाटील यांनी सर्व ताकदीनिशी निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास ते काँग्रेस सोडून इतर पक्षाकडून निवडणूक लढवणार की काँग्रेसचे नेते त्यांना सांगली विधानसभेचा शब्द येणार? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.