uddhav thackeray shahu chhatrapati vishal patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : निष्ठावंत शिवसैनिक प्रचार थांबविण्याच्या मनस्थितीत, सांगलीचा वाद कोल्हापुरात

Sangli Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने सांगली मतदारसंघावरील दावा अजूनही सोडलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी 'मातोश्री'कडे न्याय मागितला आहे.

Rahul Gadkar

सांगली लोकसभा मतदारसंघात ( Sangli Lok Sabha Election 2024 ) चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या मेळाव्याकडे फिरवलेली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ त्याला कारणीभूत ठरली आहे. जोपर्यंत काँग्रेसचे विशाल पाटील ( Vishal Patil ) 'मशाल' हातात धरत नाहीत, तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत, असे तोंडी आदेश 'मातोश्री'वरून निघाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

त्याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत. जर सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मदत करणार नसतील तर आपणही मदत का करायची? अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाशी तडजोड आणि शाहू महाराज छत्रपती यांचा आदर करून आपल्या काळजावर दगड ठेवत कोल्हापुरातील शिवसेनेची जागा काँग्रेसला सोडल्याचे बोलले जाते. त्याबदल्यात काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिल्याचे सांगितले जाते. मात्र, सांगलीतून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी दिल्लीवारी करत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. शिवाय शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या मिरज येथे झालेल्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने या मतदारसंघावरील अजूनही दावा सोडलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी 'मातोश्री'कडे न्याय मागितला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचे पडसाद आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही उमटत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत सामील असलेले शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिक संतप्त झाले आहेत. जर आपल्याला सांगलीत मदत होत नसेल, तर आपणही काँग्रेसला का मदत करायची? अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.

आज शनिवारी ( 30 मार्च ) कोल्हापूर शहरातील 81 वार्डमधील शिवसैनिकांचा होणारा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार करण्यात आघाडीवर असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाई केल्यानंतर कोणताही पदाधिकारी उघडउघड बोलण्यास तयार नाही. मात्र, शिवसैनिकांच्या मनातील खदखद खासगीत बाहेर येत आहे.

महाविकास आघाडीत चार ते पाच जागांवरून तिढा अद्यापही कायम आहे. यातील काही जागांवर ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचा इशारा देण्यात आला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "काँग्रेसनं मैत्रीपूर्ण लढत जाहीर करावी. मग, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातही मैत्रीपूर्ण लढती करायच्या का? काँग्रेस हा समजूतदार पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होते, हे त्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते."

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT