Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : भर सभेत तरूणानं लिहिलेलं पत्र पाटलांनी वाचलं अन् एकच हशा पिकला; काय केली मागणी?

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil )माढा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Election 2024 ) सभा पार पडली. यावेळी एका तरूणानं लग्न होत नसल्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लिहिलेलं पत्र जयंत पाटील भर सभेत वाचून दाखवलं. यानंतर जयंत पाटील यांच्यासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण, 45 वर्षातीत सगळ्यात जास्त बेकारी सध्या सुरू आहे, अशी चिंताही पाटील यांनी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?

श्रीपूरमधील महाळुंग येथील सुरेश अप्पा विठ्ठलराव गुंड या तरूणानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जयंत पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांना लग्न होत नसल्यानं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र जयंत पाटील यांनी वाचून दाखवलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रात काय?

निवेदन देतो की, मंत्रीसाहेब राज्यातील प्रत्येक गावात गावात 40 ते 50 मुलं बिगर लग्नाची आहेत. त्याचं कारण बऱ्याचशा मुली नोकरीसाठी शहरात गेल्या आहेत. ती चांगली गोष्ट आहे. पण, त्यातील बऱ्याचशी मुली लग्नाच्या आहेत. त्यांना पगार भरपूर मिळतो. थोडे पैसे घरी आई-वडिलांना पाठवतात आणि उरलेल्या पैशांतून मौज-मजा करतात. इकडं गावाकडं मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे मुलं व्यसनी आणि उद्विग्न झाली आहेत. तरी मुला-मुलींची लग्न झाल्याशिवाय महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू नये. त्यामुळे खेडेगावातील बिगरलग्नाच्या मुलांची संख्या कमी होईल. ती खेडेगावातील मुलं कायमची आपल्या पाठिशी राहतील. तरी, आपल्या मर्जीनुसार अहवाल काढावा.

हे पत्र जयंत पाटील यांनी वाचून दाखवल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर जयंत पाटील म्हणाले, "हे समाजातील गंभीर प्रश्नाचं वर्णन आहे. देशात बेकारी प्रचंड वाढली आहे. 45 वर्षात सगळ्यात जास्त बेकारी भारतात आहे. देशातील तरूणांच्या हाताला काम नाही. मुंबईच्या 'आयआयटी'मधून पास झालेली मुलं हुशार असतात. त्यांना कुणीही नोकरी देतात. त्यातील 50 टक्के मुलं पुढील शिक्षणासाठी गेली आहे. तर उरलेल्या 50 टक्क्यांमधील 36 टक्के जणांना नोकरी मिळाली नाही."

"देशात प्रचंड हुशार असलेल्या मुलांच्या हातालाही काम मिळत नाही, अशी भारतीय अर्थव्यवस्थेची अडचण झाली आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळे देशात बेकारी वाढली आहे. आपल्याला दाखवलं एक, पण परिस्थिती वेगळी आहे. हे प्रत्येक घराघरात पाहायला मिळेल. गुंतवणूक आवश्यक तेवढ्या वेगानं होत नाही. त्यामुळे देशातील तरूणांसमोर समस्या आहेत," असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT