Jayant Patil, Sadabhau khot, Nishikant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Mahayuti News : लोकसभा निकालाआधीच इस्लामपूर महायुतीत उडाले खटके; भाजपच्या जिल्हाध्यक्षावर आक्षेप

Bjp News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीचे बेरजेचे राजकारण गृहीत धरून एक एक उमेदवाराला पडद्यामागून मदत करण्याचे काम सुरू झाले आहे.

Rahul Gadkar

Loksabha Election News : लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात निकाल स्पष्ट होणार आहे. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल झाल्यानंतर अनेक राजकीय स्फोट अनेक मतदारसंघात होणार आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखलेले डावपेच आणि त्यातून लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हाच त्याला कारणीभूत असणार आहे.

विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवून आमदार होण्याची महत्त्वकांक्षा अनेकांना आहे. त्यामुळे आत्तापासूनच अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीचे बेरजेचे राजकारण गृहीत धरून एक एक उमेदवाराला पडद्यामागून मदत करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा बरेच गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून घडले आहेत. त्यातून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप आपापल्या पक्षात होत आहेत. (Sangli Mahayuti News )

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ही हेच चित्र आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वाभिमानीला मदत केली असल्याचा आरोप महायुतीतील भाजप, शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महायुतीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यात लोकसभेच्या प्रचाराच्या मानपानावरून चांगलीच जुंपली आहे. दोघांनीही स्वतंत्रपणे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचा प्रचार केल्याने एकमेकांबरोबर अनेक गैरसमजाच्या अफवा उठवल्या आहेत. त्यात भाजपचे राहुल महाडिक यांनी देखील निशिकांत पाटील यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. युतीधर्म न पाळल्याचे आरोप निशिकांत पाटील यांच्यावर होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत अर्धा डझनभर इच्छुक, बंडखोरी निश्चित

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्धा डझनवर इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसेनेचे अनंतराव पवार यांच्यासह अन्य दोघे इच्छुक आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रबळ माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) हे विधानसभेसाठी सज्ज आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी हातकणंगलेमधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचे डावपेच आखल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास महायुतीमध्ये बंडखोरी अटळ आहे, हे नाकारता येणार नाही.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT