Rajendrasinh Yadav celebrates a decisive mayoral victory in Karad as the Lokshahi–Yashwant alliance delivers a major setback to BJP dominance in the municipal election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politics : शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपला लोळवलं; थेट फडणवीसांनी ताकद देऊनही अतुल भोसले चितपट

Karad Election Result : कराड नगरपालिकेत लोकशाही-यशवंत आघाडीने भाजपला मोठा धक्का देत नगराध्यक्षपद काबीज केले. यादव यांच्या प्रचंड मताधिक्याने शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

सचिन शिंदे

Karad NagarPalika Result : कराड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाल्यापासूनच प्रचारात घेतलेलील आघाडी राजेंद्रसिंह यादव यांनी कायम राखत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तब्बल 9 हजार 735 इतक्या मताधिक्याने यादव येथील तिसरे लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरले. आमचं ठरलंय... अशी हाक देत यादव गटाने फोडलेली डरकाळी अनेक अर्थाने शहराच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.

माजी मंत्री बाळासाहेब पाटील व राजेंद्र यादव यांच्या आघाडीमुळे भाजपची शहरातील पकड सैल झाली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद देऊन देखील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार अतुल भोसले यांच्यासारख्या मातब्बरांना पाटील यांनी पराभवाची धूळ चारली. सत्तेत असताना पराभव झाल्याने पालिकेचा निकाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे.

एकसंध भाजपला तडा

भाजपचा पक्षांतर्गत विरोध कोणाला आहे, तो किती टोकाचा आहे, यावर निवडणूक काळात चर्चा झाली. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम पेंढारकर, नितीन वास्के यांच्या सारख्यांनी लोकशाही-यशवंत विकास आघाडीला साथ दिली. त्यामुळे भाजपमधील सुंदोपसुंदीवरही निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश पडल्याचे दिसते. त्यामुळे भाजप एकसंघ आहे, या विश्वासाला तडा गेल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. शहरातील निष्ठावंत भाजप कार्यकत्यांवर उमेदवारीवरून झालेल्या कार्यकर्त्यांवर उमेदवारीवरून झालेल्या अन्यायाची चीड असल्यानेच अनेकजण पक्षापासून दुरावले.

त्यातच 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी पडूनही भाजपने तेथे खुल्या प्रवर्गातील उमेदवार न देता हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनायक पावसकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे साहजिक निर्णायक असलेला मुस्लिम मतदार भाजपपासून दुरावला. त्यात मराठा फॅक्टर प्रचाराच्या चर्चेत आला नसला, तरी छुप्या पद्धतीने मराठा फॅक्टरचाही भाजप उमेदवाराला फटका बसल्याचे दिसते. त्यामुळे यादव यांचे मताधिक्य वाढल्याचे दिसते.

निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू ठेवून उमेदवारी देताना त्यातील अनेकांना डावलले गेल्याचा फटका प्रभागातील निकालात दिसतो. अनुभवीपेक्षा नवखे चेहरे पालिकेत आणण्याचे स्वप्न भाजपने पाहिले. मात्र, शहरवासीयांनी ते धुळीस मिळवले. त्याउलट लोकशाही- यशवंत विकास आघाडीने नव्या जुन्यांचा मेळ घालून उमेदवारी दिल्या. त्या लोकांच्या पचनी पडल्याने या आघाडीच्या जुन्या 11 जणांना मतदारांनी पुन्हा पालिकेत पाठवले.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भागातही पक्षाची पीछेहाट पदाधिकाऱ्यांना विचार करायला लावणारी आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या विजयासाठी एकत्र आलेल्यांनी वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या, उमेदवारी न मिळाल्याने झालेली नाराजी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब, नाराज पदाधिकारी यासारख्या बारकाव्यांकडे झालेले दुर्लक्षही भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते.

निकालाचे दूरगामी परिणाम

निकालानंतर अवघ्या काही तासांत पालिका झाली आता झेडपी..' असे अनेकांच्या मोबाईलवरील स्टेटस झळकले. त्यामुळे आगामी काळातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरही निकालाचे परिणाम शक्य आहेत. त्यासाठीही वेगळ्या पद्धतीने राजकीय मांडणी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी वेगळी आखणी करताना भाजपला रोखण्यासाठी समविचारांची आघाडी होण्याची शक्यता आहे. कन्हाड दक्षिणेतील राजकारणालाही या निकालाने कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत.

'लोकशाही- यशवंत'ची केमिस्ट्री जुळली

शहरातील सत्ता शहरातच ठेवायची, हे ध्येय घेऊन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी व राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी एकत्र आली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा प्रश्न सुटल्याने व जागा वाटपाचा तिढा सुटल्याने दोन्ही आघाड्यांची केमिस्ट्री जुळली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पाळलेल्या लोकशाही आघाडीला यानिमित्ताने बूस्टर डोस मिळाला. बघता बघता 13 जागा जिंकूनआघाडी पहिल्या क्रमांकावर गेली. पाटील व यादव यांच्या प्रचारात सुसूत्रता व योग्य समन्वयामुळे त्यांना विजयाचा टप्पा गाठता आला.

काँग्रेसची सफाई

पालिकेच्या निकालाने काँग्रेसचा सुपडासाफ झाला. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी झाकिर पठाण यांच्यासह 8 उमेदवार दिले. त्यातील एकही निवडून आला नाही. काँग्रेसचाच नगराध्यक्ष होईल, असा दावा दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तोही फोल ठरला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला केवळ 2 हजार 309 मते मिळाली. एवढ्या दारुण पराभवाची काँग्रेसची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT