Solapur, 09 January : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘आपण आहे तिथेच बरा आहे,’ असे सांगून त्यांनी आपण अजितदादांसोबत कायम आहोत, असेही स्पष्ट केले.
दरम्यान, त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे पिता-पुत्रांच्या मनात नेमकं काय आहे? त्यांचा कल कमळाकडे की घड्याळाकडे कायम राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिट न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणारे माजी आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांंनी आज सकाळीच अजितदादांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत कायम राहणार असल्याचे सांगितले.
मी आहे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात) तिथेच बरा आहे, असे सांगून आपण बबनराव शिंदे यांनी आपण अजित पवारांसोबतच (Ajit Pawar) राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, बबनदादांनी अजितदादांची भेट घेतल्यानंतर शिंदे कुटुंबीयांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण बबनराव शिंदे यांचे चिरंजीव आणि माढ्यातून अपक्ष निवडणूक लढविणारे रणजितसिंह शिंदे यांंनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती.
विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहानंतरही बबनराव शिंदे यांनी घड्याळवर निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बबनराव शिंदे यांनी विधान परिषदेचा शब्द घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करू नये, असा आग्रह धरला होता. त्यामुळे बबनराव शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडणार का, असा प्रश्न चर्चिला गेला हेाता.
कार्यकर्त्यांचा दबाव आणि रणजित शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने माढ्याचे शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपण अजितदादांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे शिंदे पिता-पुत्राचा निर्णय काय असणार, याची उत्सुकता माढावासियांना लागली आहे.
...तेव्हा अजितदादांची विनंती धुडकावली
विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढ्यातून माजी आमदार बबनराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा आग्रह केला होता. मात्र, शिंदे यांचा ओढा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे होता. मुलाला तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही, तसेच बबनराव शिंदेंनी घड्याळाची उमेदवारी घेतली नाही, त्यामुळे रणजित शिंदे यांनी माढ्यातून अपक्ष विधानसभा लढवली. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.