Mahadev Jankar Solapur News :
लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकपूर्व मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात मोहिते विरुद्ध निंबाळकर असे राजकारण तापलेले असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हेदेखील माढा मतदारसंघातून दंड थोपटणार आहेत. यासाठी रासपकडून 17 फेब्रुवारीला माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जानकरांच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Mahadev Jankar हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रासपकडून विद्ममान खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गड मानला जाणाऱ्या फलटणमध्ये 'माढा विजय निर्धार' मेळाव्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
तत्पूर्वी 17 फेब्रुवारीला माण तालु्क्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शिंगणापूर - कोथळे - जावली - मिरडे - नाईकबोमवाडी - वडले - सोनवडी - सोनवडी बुद्रुक - कोळकीमार्गे फलटण शहरातील मेळाव्याच्या ठिकाणी दुपारी एक वाजता दाखल होणार आहे.
महादेव जानकर हे माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काहीही करून माढा मतदारसंघ जिंकायचाच यासाठी रासपकडून माढा मतदारसंघात घोंगडी बैठकांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. या बैठकांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, भाजप सरकार हे जनतेच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात मश्गूल झालेले दिसून येत आहे. माढ्याचे खासदारदेखील पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत काम करत आहेत.
गत निवडणूक झाल्यानंतर विद्ममान खासदारांचे मतदारसंघातील जनतेला दर्शनदेखील दुर्लभ झाले आहे. मतदारसंघात पाण्यासह उद्योग, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा असंख्य समस्या असल्याचे घोंगडी बैठकीत मतदारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या खासदाराला आता घरी पाठवण्यासाठी आणि मतदारसंघांचे निस्वार्थी भावनेने प्रश्न सोडवण्यासाठी माढा विजय निर्धार मेळ्यावत बहुसंख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील 48 जागांवर रासपचे उमेदवार दिसून येतील, तर स्वत: महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी 17 तारखेच्या माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात जानकर हे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा मतदारसंघात उमेदवार कोण यावरून भाजपमध्येच रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, वाढती बेरोजगारी, ओबीसी मराठा समाजामध्ये निर्माण झालेला वाद, दुष्काळाची परिस्थिती यांसारखे असंख्य प्रश्न समोर असताना राज्यात पक्ष फोडाफोडीचे आणि गोळीबाराचे प्रकार सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जानकर काय बोलणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष राहणार आहे.
माढा मतदारसंघात विद्ममान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजप सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते पाटलांच्या घरातून धैर्यशील मोहिते यांनीही आपण माढ्यातून लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोहिते आणि निंबाळकर दोन्ही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यातच अजित पवार गटाकडूनदेखील माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात माढा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.