Madha Loksabha 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Election 2024 : भाजपने डावललेले मोहिते पाटील माढ्यातून लोकसभा लढवण्याचे धाडस दाखवणार का?

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्यातून भाजपात बंडखोरी होणार का?

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा विरोध झुगारून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. महायुती आणि पक्षांतर्गत विरोधामुळे तिकीट वाटपासाठी माढा भाजपची डोकेदुखी ठरली होती. माढ्याच्या उमेदवारीची माळ भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात घातली असली तरी मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Latest Marathi News)

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा चंग मोहिते-पाटील यांनी बांधला होता. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून दोन वेळा प्रचाराची फेरी पूर्ण करत निवडणूक लढवण्याची जय्यत तयारीही केली होती.

मोहिते पाटील, रामराजे यांचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजप निंबाळकरांना तिकीट देताना दहा वेळा विचार करेल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. मात्र तो फोल ठरवत भाजपने निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढ्याच्या रणांगणात उतरवले आहे. मात्र, मतदारसंघातील विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता निंबाळकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे.

निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी दंड थोपटल्यानंतर फलटणचे पारंपारिक कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांनीही खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच, त्यांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकणार नाही, असेही विधान केले होते. आता महायुतीमध्ये या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्याची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कशी समजूत घातली, हे काही दिवसांत समजून येईल. मात्र, निंबाळकरांना यावेळी माढ्याचे रण सोपे नाही,एवढे निश्चित.

मोहिते पाटील यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर माढ्यातून कोणी नाही लढले, तर मी निवडणूक लढवणार आहे, असे जाहीर विधान केले होते, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहेत त्याच पद्धतीने फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचीही भूमिका महत्वाची असणार आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने निंबाळकर यांना पसंती दिल्याने आता महाविकास आघाडीचे डावपेच काय असणार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची काय रणनीती असेल याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे. माढा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीने धनगर समाजाची मतदार संख्या आहे त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच दिशेने ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याचे सूतोवाच करत पाऊल टाकले होते. आता जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी माढा मतदारसंघ हा त्यांचा घरचा मतदारसंघ आहे. कारण, याच मतदारसंघात त्यांचे स्वतःचे गाव आहे आणि या मतदारसंघात त्यांनी आपल्या पक्षाची बऱ्यापैकी बांधणीही केलेली आहे.

शरद पवार यांच्याविषयी असणारे सहानुभूतीचे वातावरण आणि धनगर समाजाची मतदारसंख्या, मोहिते पाटील आणि रामराजेंची आताची विरोधाची भूमिका या सर्व गोष्टी लक्षात घेणेही गरजेचे आहे. निंबाळकर आणि भाजप (BJP) यातून कसा मार्ग काढतात आणि विजयापर्यंत कसे पोहोचतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT