Meenal Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Political News : माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे शरद पवार गटाकडून विधानसभा लढणार?

Harshal Bagal

Madha Vidhnsabha Election : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. येत्या काळात माढा विधानसभा मतदारसंघासाठी दिवसेंदिवस इच्छुकांच्या संख्येत भर पडत असल्याने निवडणुकीतील चुरस वाढत आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या २८ वर्षांपासून प्रतिनिधित्व करत असलेल्या आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर आगामी विधानसभेला पारंपारिक विरोधकांसोबत आणखी एक विरोधक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिपद नाकारून सीना माढा उपसा सिंचन योजना मार्गे लावणारे आमदार बबनराव शिंदे हे पर्मनंट आमदार म्हणून ओळखले जातात. परंतु आमदार बबनराव शिंदे यांनी नेहमीच स्वतःच्या विरोधात अनेक विरोधक उभा करून मतांची विभागणी करण्याचा डाव साधत असतात. त्यांनी विधानसभेला मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा पराक्रम केला आहे.

गेल्या विधानसभेला शिवसेनेतून संजय कोकाटे हे उमेदवार होते. बबनराव शिंदे यांना गेल्या विधानसभेला 1 लाख 42 हजार 573 मते मिळाली. संजय कोकाटे यांना 74,378 मते मिळाली. शिंदे यांनी 68,195 या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला होता.

गेल्या विधानसभेला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शांततेची भूमिका घेत कोकाटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. यंदाच्या विधानसभेच्या हंगामात मात्र मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे देखील इच्छुक आहेत . तर दुसऱ्या बाजूला संजय कोकाटे यांनी कावड यात्रेच्या बेंबळे येथील सभेमध्ये आपण देखील विधानसभेसाठी इच्छुक आहोत, हे स्पष्टपणे भूमिका जाहीर केले.

विजयसिंह मोहिते पाटील गट सक्रिय

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील माढा विधानसभा निवडणुकीकडे लक्ष घालायला सुरुवात केली आहे. विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला निधी देण्याचे काम केले. त्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचे त्यांनी सूत्र अवलंबले आहे. त्यामुळे साहजिकच मोहिते पाटलांचा ही एक उमेदवार माढा विधानसभेला राहण्याची शक्यता आहे.

राज्यात झालेलं पक्ष फुटीचा कटकारस्थान, राज्यात रात्रीत घडलेले सत्तांतर, राज्यातील प्रमुख पक्षांची होणारी महायुती व महाआघाडी यादेखील माढा विधानसभेच्या उमेदवारीला दिशा बदलवण्याचे काम करू शकतात.

आमदार शिंदे गट माढा तालुक्यामध्ये बॅकफुटवर

आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात शरद पवार यांनी खुद्द मोर्चा वळवल्याचे अनेक वक्तव्यातून स्पष्टपणे भूमिका दाखवलेली आहे. बारामतीच्या गोविंद बागेमध्ये आमदार शिंदे यांचे पत्र घेऊन रणजीत शिंदे यांनी शरद पवार यांना दीपावलीच्या निमित्ताने भेट घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी मात्र कापसेवाडीच्या सभेत ज्यांनी कोणी बोगस कर्ज प्रकरण शेतकऱ्यांच्या सभासदांच्या नावाने केले आहेत, त्यांच्या याद्या माझ्याकडे द्या, मी त्यांचा बंदोबस्त करतो, असे म्हणत आमदार शिंदे पिता-पुत्रांचे टेन्शन वाढवले आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे यांच्याकडून झालेली बेताल वक्तव्य यामुळे आमदार शिंदे गट माढा तालुक्यामध्ये बॅकफुटवर आहेत.

.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मीनल साठेंचे सूचक वक्तव्य

दुसऱ्या बाजूला शरद पवार (sharad pawar) यांच्या कापसेवाडी येथील सभेत माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी देखील पवार गटाकडून माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी तयार आहोत, असा स्पष्ट इशारा दिला. त्यामुळे साठे जर शरद पवार गटाकडून उभारल्या तर आमदार शिंदे समोर एक नवीन आव्हान उभे राहणार आहे. मीनल साठे यांना माढासह माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील विधानसभेला जोडलेल्या गावांमध्ये मोठा जनसंपर्क निर्माण करावा लागणार आहे. हे देखील साठे यांच्या समोरील नवे आव्हान असणार आहे.

उमेदवारीला धनाजी साठेंचा हिरवा कंदील

एकेकाळी काँग्रेसमधून माढा विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार धनाजीराव साठे यांना त्यांच्या सुनबाई मीनल साठे या माढ्याच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या गटातून इच्छुक असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, धनाजीराव साठे यांनी थेट सांगून टाकले जर सुनबाईंची इच्छा असेल तर आम्ही त्यांना कसे रोखणार ? त्यांची जी भूमिका तीच आमची भूमिका असेल, असे म्हणत आगामी काळात माढा विधानसभेच्या शरद पवार गटातून उमेदवारीच्या मागणीला धनाजी साठे यांनी देखील हिरवा कंदील दर्शविला आहे.

साठेंना जमीन विकून बिले दिल्याची सहानुभूती मिळणार

माजी आमदार धनाजीराव साठे (Dhnajairao sathe) यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या आशीर्वादाने सुरू केलेल्या संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याला सभासदांनी विश्वास दाखवत ऐन दुष्काळात देखील ऊस घातला. त्या सभासद शेतकऱ्यांची बिले वेळेवर देण्यासाठी धनाजीराव साठे यांनी स्वतःची जमीन विकून बिले वेळेवर दिली. याची सहानुभूती देखील परिवाराच्या बाबतीत असल्याने साठेंना याचा देखील फायदा होऊ शकतो.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT