Mahadev Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankar : शांघाय झालं...कॅलिफोर्निया झालं...आता दुबईचं गाजर; राजकारण्यांची नुसतीच बोलंदाजी

Indapur Nagar Parishad Election 2025 : महादेव जानकर यांच्या नवीन निवडणूक आश्वासनामुळे जुनी अपूर्ण आश्वासने, मतदारांची नाराजी आणि राजकारण्यांच्या अवास्तव बांधिलकीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Vijaykumar Dudhale

निवडणुका येताच राजकारणी अवास्तव आणि हवेत विरघळणारी आश्वासने देतात—मुंबईला शांघाय आणि कोकणाला कॅलिफोर्निया करण्यासारखी.
इंदापूर निवडणुकीत महादेव जानकर यांनी आणखी एक गाजावाजा करणारे आश्वासन दिले—“इंदापूरचे दुबई करू.”
शेतकरी कर्जमाफीसारखी वास्तववादी आश्वासनेही सरकारकडून वेळेवर पूर्ण न झाल्याने आंदोलने उभी राहिली.

Indapur, 24 November : निवडणुका आल्या की राजकारण्यांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. आवक्यात असणारी, नसणारी आश्वासनं दिली जातात. ती पूर्ण करता येतील, तेवढा आपला आवका आहे का? हे काहीच पाहिले जात नाही. मतं मिळवून सत्ता काबीज करण्यासाठी मशिनगनसारखी धडाधडा तोंडाची वाफ वायफट घालवत आश्वासनांचा धुराळा उडवला जातो. असंच काहीसं आश्वासन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार महादेव जानकर यांनी दिलं आहे, त्यामुळे पूर्वीच्या राजकारण्यांनी दिलेली आश्वासनांची यादीच समोर येते.

मुंबईची (Mumbai) शांघाय करू, असे आश्वासन प्रथम 2004 मध्ये माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी दिले होते. पण ते अजूनपर्यंत साकार झालेले नाही. पण, अनेक राजकारणी आजही त्या घोषणेची पुनरावृत्ती करतात. आजही मुंबईला शांघाय बनवू, असे म्हटले जाते. पण त्यासाठी प्रयत्न तर सोडाच तशा हालचालीही होताना दिसत नाहीत.

कोकणाचा (Konkan) कॅलिफोर्निया करू, असंही एक आश्वासन देण्यात आलं होतं. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर नेतेमंडळींनी त्याचा निवडणुकीच्या प्रचारात मतं मिळविण्यासाठी अनेकदा उच्चार केला आहे. कॅलिफोर्निया हा निसर्गाने संपन्न असणारा अमेरिकेतील प्रदेश आहे. त्या ठिकाणी निसर्गाची जोपासना करून संतुलित भौतिक विकासासाठी कॅलिफोर्निया ओळखला जातो. या कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूडमधील चित्रपटाची शूटिंग मोठ्या प्रमाणात होते.

कॅलिफोर्नियासारखीच निसर्गसंपदा कोकणाला लाभलेली आहे. त्याच धर्तीवर कोकणाचा विकास करण्याच्या दृष्टीने राजकारण्यांकडून कॅलिफोर्निया करण्याची घोषणा केली जाते. मात्र, निवडणुका झाल्यानंतर ते आश्वासन हवेत विरघळते. त्यामुळे आजपर्यत तर कोकणाचा कॅलिफोर्निया आणि मुंबईची शांघाय होऊ शकलेली नाही. आता त्यात नवीन घोषणेची भर पडली आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरत शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गारटकर यांना त्यांचे आतापर्यंतचे पारंपारिक विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.

माजी मंत्री महादेव जानकर हे गारटकर यांच्या प्रचारासाठी रविवारी इंदापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना निवडून द्या; आम्ही इंदापूरचे दुबई केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राजकारण्याच्या आणखी एका अशक्यप्राय अशा आश्वासनाची भर पडली आहे.

नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती विशेषतः भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आलेल्या महायुतीला त्या आश्वासनाची अमंलबजावणी करण्यासाठी शेतकरी नेत्यांना मोठी आंदोलनं उभी करावी लागली. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नागपूरमधील आंदोलनानंतर सरकारने 30 जूनच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे.

प्र.1: लेखाचा मुख्य मुद्दा काय आहे?
उ: निवडणुकीच्या तोंडावर दिली जाणारी अवास्तव राजकीय आश्वासने आणि त्यांची अपूर्णता यावर भाष्य आहे.

प्र.2: पूर्वी कोणती मोठी आश्वासने पूर्ण झाली नाहीत?
उ: मुंबईला शांघाय आणि कोकणाला कॅलिफोर्निया करण्याची आश्वासने.

प्र.3: इंदापूरमध्ये कोणते नवीन आश्वासन दिले गेले?
उ: महादेव जानकर यांनी "इंदापूरचे दुबई" करण्याचे आश्वासन दिले.

प्र.4: शेतकरी कर्जमाफीचे काय झाले?
उ: आंदोलनांनंतर सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT