

सांगोला नगरपालिकेत भाजप–शेकाप युतीमुळे शहाजीबापू पाटील नाराज होऊन जयकुमार गोरे व आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावर खुली टीका केली.
पैशाच्या जोरावर तालुका विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप करत शहाजीबापूंनी स्वतःचे नेतृत्व व स्वाभिमान ठामपणे मांडले.
भाई गणपतराव देशमुखांच्या वारशाचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार आता आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.
Solapur, 23 November : सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाने एकत्र येत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकटं पाडलं आहे, त्यामुळे चिडलेल्या शहाजीबापूंनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोरच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर निशाणा साधला. भाई (स्व.) गणपतराव देशमुखांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार त्यांनी गमावलाय. कारण, आबासाहेबांनी आयुष्यात जे काही मिळवलं, ते नातवानं सगळं घालवलं, अशी टीका माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार डॉ. देशमुख यांच्यावर केली.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पॅनेलच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत शहाजीबापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख ( Dr. Babasaheb Deshmukh ) यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, आता भाजपलाही कळून चुकलं आहे की त्यांचं कंबरडं मोडलं आहे, काम झालंय तमाम. आता रात्री बसल्याती. हा सांगोला तालुका आहे, अरं येड्या तुझी अब्जाधीशाची थाळी धुडकावून माझ्या सांगोल्याची जनता आनंद मानेंच्या झोपडीतील भाजी भाकरी खाईल. पैशाच्या जेारावर तालुका विकत घेऊ नका. तुमचा घनघोर अपमान होईल. आमच्याकडे सत्ता नसेल मी पण आमच्या मनटात ताकद आहे. मला धमकवता? कुठली तरी माकडं आल्याती आणि मला धमकवतात.
एक जण म्हणताये, लय अवघड आहे, शहाजीबापू तुमच्या पाया पडतो. पाच ते सहा जागा घ्या आणि होय म्हणा. काय ......अवलाद आहे काय? मी म्हटलं चल इथून. दुसरा एक जिल्हाध्यक्ष आला आणि म्हणाला, आपण फडणवीस साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि सात आठ जागा देतो. तो मला जागा देणार. अरं तुम्ही सांगोल्याच्या राजालासुद्धा भीक वाढायला लागलात. काय कळतं काय तुम्हाला. पडलो तरी जिंकलो तरी मी सांगोल्याचा राजा आहे, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले.
भाई (स्व.) गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील सोडून सांगोला तालुक्याला कोणी खपवायचं नाही. भाई गणपतराव देशमुखांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार त्यांनी (नाव न घेता डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका) गमावला आहे. आता समाधीची पूजा करण्याचा अधिकार ह्या पठ्ठ्याला आहे. आनंदा मानेला निवडून आणा आणि त्यांना भाई देशमुखांच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांनी आयुष्यात जे काही मिळवलंय, ते नातवानं सगळं घालवलं, असा टोलाही शहाजीबापूंनी आमदार बाबासाहेब देशमुखांना लगावला.
प्र.1: शहाजीबापूंनी कोणावर सर्वाधिक निशाणा साधला?
उ: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावर.
प्र.2: नाराजीचे मूळ कारण काय?
उ: भाजप–शेकाप युतीने त्यांना एकटे पाडल्याची भावना.
प्र.3: त्यांनी कोणते आवाहन केले?
उ: आनंद माने यांना निवडून आणून भाई देशमुखांच्या वारशाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
प्र.4: शहाजीबापूंनी मतदारांना काय संदेश दिला?
उ: सत्ता नसली तरी मनात ताकद आहे; स्वाभिमान विकता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.