Maharashtra Drought Affected Students AI
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Drought: दुष्काळात शाळा ठरणार विद्यार्थ्यांचा आधार; संकटाशी दोन हात, शिक्षणाची साथ! कृती आराखडा जाहीर

Drought Affected Students:दुष्काळाच्या संकटात प्रत्येक शाळेने शैक्षणिक आधार केंद्र म्हणून काम करावे आणि प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संरक्षक म्हणून भूमिका बजावण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहे.

Mangesh Mahale

Jalna News: नैसर्गिक आपत्ती अथवा तीव्र दुष्काळाच्या काळात केवळ अन्न-पाण्याची टंचाई निर्माण होत नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम होतो. कुटुंबाचे स्थलांतर, वाढत्या आर्थिक अडचणी आणि बालमजुरीचा धोका यांमुळे मुले शाळाबाह्य होण्याची मोठी शक्यता असते. हीच अडचण ओळखून जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (माध्यमिक) पुढाकार घेतला आहे. दुष्काळात एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी विशेष कृती आराखडा जाहीर केला आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळू रुस्तुम खरात यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या योजनेनुसार, दुष्काळात गावातील शाळा ही केवळ शिकवण्याचे ठिकाण न राहता विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित 'शैक्षणिक आधार केंद्र' म्हणून काम करेल.

समाजाचा सहभाग आणि सामूहिक जबाबदारी

विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही केवळ शाळा किंवा पालकांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

गावात पाणीटंचाई असल्यास तिथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय करणे, बालविवाह किंवा बालमजुरी रोखणे आणि आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळवून देणे यासाठी संपूर्ण गावपातळीवर समन्वय साधला जाणार आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर महत्त्वाची धुरा

मुख्याध्यापकांनी प्रशासकीय कामांपुरते मर्यादित न राहता संवेदनशील नेतृत्व करावे, असा स्पष्ट निर्देश या आराखड्यात आहे. शाळेतील उपस्थिती घटत असलेल्या किंवा कुटुंबासोबत स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल. दुसरीकडे, शिक्षकांनी अध्यापनासोबतच समुपदेशकाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त अभ्यासाचा किंवा आर्थिक मदतीचा ताण न आणता कमीत कमी साधनांत परिणामकारक शिक्षण देण्यावर भर दिला जाईल.

पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे मनोबल

परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांच्या शिक्षणाला द्वितीय स्थान देऊ नये, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. विशेषतः मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दुष्काळातही अभ्यासासाठी घरात योग्य वातावरण ठेवावे. विद्यार्थ्यांनीही धीर न सोडता उपलब्ध पुस्तकांच्या साहाय्याने दररोज अभ्यास सुरू ठेवावा आणि जलसाक्षरतेचे महत्त्व समजून घ्यावे.

"छत्रपती शिवाजी महाराजांची जलव्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि महात्मा जोतीराव फुले यांनी दुष्काळात दिलेला सामाजिक आधार हेच आपले प्रेरणास्थान आहे," असे सांगत शिक्षणाधिकाऱ्यांनी 'संकटावर मात करू, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवू' असा निर्धार व्यक्त केला आहे.

दुष्काळाच्या संकटात शैक्षणिक आधार घोषवाक्य

“संकट कितीही मोठे असले, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट थांबता कामा नये!”

“पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवू या. शिक्षणाचा प्रत्येक दिवस सार्थकी लावूया!”

प्रमुख उद्दिष्टे

१. दुष्काळामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ न देणे.शालेय शिक्षण

२. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती आणि अध्ययनातील सातत्य टिकवून ठेवणे.

३. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, स्थलांतरित, दिव्यांग आणि इतर जोखमीतील विद्यार्थ्यांना विशेष मदत करणे.

४. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि आत्मविश्वास जपणे.

५. शाळांमध्ये पाणीबचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जपणुकीची संस्कृती विकसित करणे.

६. शाळा, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT