

Gokul Election Result: राज्यात सत्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, जिल्ह्यातील तीन दिग्गज मंत्र्यांचा दबदबा... एका बाजूला अशी शक्तिशाली ताकद. तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची प्रामाणिक आणि निष्ठावंत फळी घेऊन एकट्याच्या जीवावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या राजकारणात वादळात दिवा लावला.
सतेज पाटील यांच्या ‘परफेक्ट’ नियोजनामुळे महायुतीचा आणि त्यातही महाडिक-मुश्रीफ या जोडीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम झाला. या विजयाने आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध होईल, अशा वावड्या सोडल्या जात असताना सतेज पाटील मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणार असे ठामपणे सांगत होते. अपेक्षेप्रमाणे ‘गोकुळ’ची निवडणूक लागली. महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच ‘चिन्ह’ मागणीच्या निमित्ताने आमदार पाटील यांनी आपले उमेदवारही जाहीर केले.
महायुतीच्या उमेदवारीचा गुंता सुटण्यापूर्वीच १८ उमेदवारांची घोषणा करून पहिली लढाई त्यांनी जिंकली. महायुतीतील नाराजीतून काही तगडे उमेदवार आपल्याकडे येतील या आशेवर ते होते, यातही त्यांना यश आले. महायुतीने उमेदवारी नाकारलेल्या प्रा. किसन चौगले या विद्यमान संचालकांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन थेट उमेदवारीच दिली.
सर्व उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पायाला भिंगरी बांधून त्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील ठरावदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या पॅनेलमध्ये घराणेशाहीशी संबंधित उमेदवारांचा भरणा असताना पाटील यांनी मात्र राबणाऱ्या, त्यांच्याशी निष्ठा असलेल्या आणि प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवले.
महायुतीकडून एकीकडे ठरावदारांच्या आणि नेत्यांच्या शपथा घेण्याचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळी पाटील हे गावागावांत जाऊन ‘गोकुळ’ कसा वाचवला पाहिजे, यासाठी धडपड करून ठरावदारांना आपली भूमिका पटवून देत राहिले. गुजरातच्या दावणीला ‘गोकुळ’ बांधला जाईल, त्याचे खासगीकरण होईल, तो सर्वसामान्यांचा आणि दूध उत्पादकांचाच राहणार नाही यावर त्यांनी आपला प्रचार केंद्रित केला.
याशिवाय सत्ता आल्यानंतर उत्पादकांना काय देणार याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. निकालात त्यांच्या या भावनिक आवाहनाला आणि तळमळीला ठरावदारांनी साथ दिल्याचे दिसले. एकदा मैदानात उतरले की समोर कितीही ताकदीचा पैलवान असो त्याच्याशी लढायचा हा लढाऊ बाणाही पाटील यांच्या कामी आला.
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात, राज्यात आणि देशातही महायुतीचे वारे असताना शाहू महाराज यांना रिंगणात उतरवून त्यांना विजयी करण्यात आणि काँग्रेसचा हा बालेकिल्ला जिंकण्यात यश मिळवले. आपल्या भाषणातही ते मी ९६ कुळी मराठा पाटील आहे, मी एकदा ठरवले की ते करतोच असे जाहीरपणे सांगायचे आणि तेच त्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत करून दाखवले.
एकीकडे प्रचाराच्या निमित्ताने सतेज पाटील जिल्हाभर फिरत असताना ठरावदारांना भेटणे, त्यांच्याशी पाटील यांचा संपर्क करून देणे, त्यांची भूमिका पटवून सांगणे, सहलीवर पाठवण्यासाठी जोडण्या लावणे, यासाठी त्यांच्या ‘अजिंक्यतारा’ची टीम सक्रिय होती. याच कार्यालयातून त्यांची सूत्रे हलत होती. पडद्यामागे राबत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीमुळेच सतेज पाटील ‘गोकुळ’मध्ये ‘सतेज’ विजय मिळवण्यात यशस्वी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.