Babanrao Dhakane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babanrao Dhakane : विधिमंडळाच्या सभागृहात उडी मारणारे बबनराव ढाकणे; पाथर्डीकरांसाठी ऑर्थर रोड तुरुंगात...

Mangesh Mahale

Nagar : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. सक्रिय राजकारण केल्यानंतर ते 2004 पासून राजकारणापासून अलिप्त झाले होते. सामाजिक कार्यात त्यांनी स्वतः गुंतून घेतले होते. सामाजिक कार्य करतानादेखील त्यांच्या वाट्याला संघर्षच आला. पाथर्डी तालुक्यातील रस्ते, वीज आणि जलसिंचनाच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली. सभागृहात उडी घेण्याचा प्रयत्न केला. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर बबनराव ढाकणेंविरोधात हक्कभंग दाखल होऊन त्यांना सात दिवसांची कैद झाली. सात दिवस ते ऑर्थर तुरुंगात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हक्कभंगाचा प्रस्ताव

बबनराव यांनी राजकीय कार्यकाळात सामाजिक कामांचा नेहमीच प्राधान्य दिले होते. पाथर्डीतील विविध मुद्द्यांवर ते नेहमीच आवाज उठवत होते. रस्ते, वीज, जलसिंचन प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून 8 जुलै 1968 रेजी पत्रके भिरकावत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.

बबनराव या वेळी एवढे आक्रमक झाले होते की, त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी तत्कालीन सरकारने त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर करत सात दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली. बबनराव यांची यानंतर तुरुंगात रवानगी झाली. पाथर्डीकरांच्या मूलभूत प्रश्नांवर बबनराव यांनी ही कैद हसत स्वीकारली. यानंतर 16 जुलैला 1968 मध्ये पाथर्डीत बबनराव यांचा अभूतपूर्व मिरवणूक पाथर्डीकरांनी काढली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

बबनराव ढाकणे वांबेरी चारी प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहिले. वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी मिळावे, यासाठी ते 1969 ते 1987 पर्यंत संघर्ष करत होते. यासाठी त्यांनी आंदोलनेदेखील केली. वांबोरी चारीच्या प्रश्नावर त्यांनी पुलोद सरकारपाठोपाठ मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंची यांचीदेखील भेट घेतली होती. यानंतर कृषी समिती स्थापन करून आंदोलने सुरू केली. चारीसाठी त्यांनी 45 गावांतील लोकांना एकत्र करत आंदोलने केली. यावर 20 डिसेंबर 1986 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेने ठराव करून मुळा धरणाचे पाणी आठमाही पद्धतीने देण्याचा निर्णय जाहीर केला.

डिसेंबर 1986 मध्ये राज्य सरकारने वांबोरी चारीस मान्यता दिली. यानंतर पुन्हा वांबोरी चारीचा प्रश्न रेंगाळला. बबनराव यांनी पुन्हा 75 गावांतील लोकांना एकत्र करत आंदोलन सुरू केले. 22 एप्रिल 1987 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. यानंतर चारच दिवसांत चारीला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थित 18 जून 1987 रोजी मिरी (ता. पाथर्डी) वांबोरी चारीचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

इंदिरा गांधींना आणले पाथर्डीत

पाथर्डीत 1962 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. पाथर्डी तालुक्याची नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळख राहिली आहे. पाथर्डी तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी बबनराव नेहमीच संघर्ष करत राहिले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 7 जानेवारी 1973 मध्ये अकोले (ता. पाथर्डी) येथे आणले होते. पाथर्डी, शेवगाव, नेवासे, नगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर काम करताना बबनराव यांनी पहिली मुला परिषद, पाटपाणी परिषद घेतली. बबनराव शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आग्रही राहायचे.

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे, शेतीसाठी पाणी. तो मार्गी लागला पाहिजे, यावर बबनराव यांनी नेहमीच संघर्ष केला. यासाठी त्यांनी आंदेलने केली. सात आॅक्टोबरला त्यांनी दहा हजार शेतकऱ्यांसह घोडेगाव (ता. नेवासे) येथील पाट फोडला. आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांना अटक झाली. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अटक झाल्याने जिल्ह्यातील तुरुंग अपुरे पडली. या आंदोलनामुळे बबनराव यांना पुन्हा सात दिवस तुरुंगात राहावे लागले. 1979 रोजी पुलोद सरकारने वांबोरी चारी संदर्भात समिती नेमली आणि मुळा धरणाचे पाणी दिले.

ऊसतोड कामगारांचा संप

बबनराव ढाकणे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर खूप काम केले. त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी 1970 मध्ये राज्यात ऊसतोड मजुरांचा पहिला संप घडवून आणला. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. शंकरराव पाटील समिती गठीत करून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर काम झाले. यानंतर समितीने ऊस तोडणीसाठी ठरवून दिलेला दर कामगारांना मिळत नसल्याने आणि त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी नगर जिल्ह्यात 5 मे 1978 रोजी बबनरावांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी पाच दिवसांचा संप केला.

साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगारांना वेठबिगार पद्धतीची वागणूक मिळायची. याविरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने त्याची दखल घेतली. बबनराव यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. हे लक्षात घेऊन त्यांनी अकोले (ता. पाथर्डी) येथे दादा पाटील माध्यमिक विद्यालयाची स्थापन केली. याशिवाच एम. एम. निर्हाळी उच्च आणि कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना बबनराव यांनी नेहमीच बळ दिले. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान स्वयंसेवी सेवाभावी संस्थांची स्थापना करून वृद्धाश्रम, उसतोड कामगारांच्या पाल्यांकरिता वसतिगृह उभारली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT