A snapshot of Maharashtra's upcoming municipal elections, highlighting key areas of contention and political dynamics as various parties gear up for critical local battles. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : महायुतीत संघर्ष तर महाविकास आघाडीची उतरती कळा..., 'स्थानिक'च्या निवडणुकांत कोल्हापूर जिल्ह्याचं चित्र नेमकं कसं?

Kolhapur Municipal Elections 2025 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड या दोन नगरपंचायती, तर गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, पेठवडगाव या ११ नगरपालिकांचा यात समावेश आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 05 Nov : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड या दोन नगरपंचायती, तर गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, पेठवडगाव या ११ नगरपालिकांचा यात समावेश आहे.

या नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या घोषणेनंतर नगर परिषद व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, १० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

सद्यस्थितीला महायुती या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट दिसत असले तरी स्थानिक पातळीवर त्या स्वतंत्र लढवल्या जाण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. मात्र या निवडणुकात मात्र महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षातच संघर्ष जास्त पहावा लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कमी पाहायला मिळाला. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष धुरळा उडवणार आहेत. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेचा राजकीय संदर्भ पाहिला तर मोठ्या विकासकामांमुळे भाजप जनसुराज्यचा आत्मविश्वास वाढला आहे.

20 सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. लोकसभा व विधानसभेतील मतांमुळे शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेची आशा वाढली आहे. त्यामुळे जनसुराज्य शक्तीला आता टिकवण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व रणवीर गायकवाड यांनी ताकदीने निवडणूक लढण्याचे केले जाहीर केले आहे. मात्र सध्यातरी भाजप जनसुराज्य आघाडीकडून 'वेट ऑन्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रंगीत तालीम म्हणून पालिका निवडणुकीला महत्त्व आले आहे. सध्या दुरंगी लढतीचे चित्र दिसत असून तरुण मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. शिरोळ नगरपालिकेच्या 20 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महायुतीकडून की आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत अनेक नेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. महायुतीमध्ये चिन्हावरून निवडणूक लढवण्यामध्ये मतभेद आहेत. माजी आमदार उल्हास पाटील यांना सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळ्या विचाराच्या तयारीत आहे.

महायुतीचे स्थानिक नेते माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यावर ठाम असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय जयसिंगपूर नगरपालिकेसाठी देखील हीच परिस्थिती आहे. यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीमार्फत ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून कोणते चेहरे दिले जाणार याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीने देखील अद्याप पत्ते खोललेले नाहीत. जयसिंगपूर नगरपालिकेचा 26 जागा लढवल्या जाणार आहेत. हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी जात पॅटर्न ठरणार महत्त्वाचा ठरणार आहे. आवाडे गटाकडे नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहे .भाजप आणि शिवसेना स्वतंत्र की महायुती म्हणून लढणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोची झाली आहे. मनसेसाठी महाविकास आघाडी आशेचा किरण आहे.

मात्र आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 21 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. मुरगूड नगरपालिकेसाठी 20 जागा आहेत. मात्र महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये संघर्ष अधिक उफाळणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. रणजितसिंह पाटील गट, जमादार गट मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.

त्यामुळे युतीची चर्चा नाही, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. प्रवीण सिंह पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर स्वतंत्र लढण्यावरच भर आहे. सध्या मुरगुड नगरपालिकेत दुरंगी लढतीची दाट शक्यता; पण अंतिम टप्प्यात तिरंगी लढत शक्य आहे. प्रवीणसिंह पाटील, संजय घाटगे गट भाजप म्हणून एकत्रित राहू शकतो. मंडलिक गटाचा निर्णय संजय मंडलिक घेणार असून महाविकास आघाडीच्या समरजितसिंह घाटगेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

चंदगड नगरपंचायत 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये देखील महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी आमदार राजेश पाटील विरुद्ध भाजपचे सहयोगी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या गटात लढत होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेससह शिवसेना ठाकरे गटा भूमिकेकडे लक्ष आहे .भाजपसाठी एकला चलो रे ची स्थिती असून नगराध्यक्षपद खुले असल्याने रंगत वाढणार आहे.

शिवाय महाविकास आघाडीतील नंदाताई बाभुळकर या आमदार शिवाजीराव पाटील किंवा माजी आमदार राजेश पाटील यांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत त्यानंतर चंदगडचे राजकारण फिरणार हे सध्याचे चित्र दिसत आहे. कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये वीस जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास व महायुती लढत शक्य आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून राजर्षी शाहू आघाडी की भाजपप्रणित महायुती यावर राजकारण सत्ताकारण अवलंबून आहे.

यड्रावकर गटाचे प्रमुख निष्ठावंत आमदार सतेज पाटील यांना भेटल्याने फुटाफुटीचे संकेत आहेत. रामचंद्र डांगे भाजपाच्या कमळावर लढणार की शाहू आघाडीच्या चिन्हावर याची उत्सुकता. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. कागल नगरपालिकेसाठी 23 जागांसाठी निवडणूक होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं होमपीच असल्याने शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि मंडलिक गटापुढे मोठे आव्हान असणार आहेत.

शिवाय भाजपने देखील अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्या असून महाविकास आघाडीतील एकाही पक्षाची इतर व्यक्तिगत ताकद नाही. त्यामुळे या नगरपालिकेतील निवडणूक माहितीच्या बाजूने वनवे होईल अशी चित्र सध्या तरी आहे. गडहिंग्लज नगरपालिकेसाठी 12 जागा आहेत. अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल अशीच लढत होण्याचे संकेत आहेत. तर भाजपची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका आहे.

शरद पवार राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांची भूमिका जाहीर केली नसली तरी हा पक्ष जनता दलासोबत राहण्याचे संकेत सध्या तरी दिसत आहेत. शिवाय महायुती मधील विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती देखील जनता दलाच्या बाजूने उभे राहू शकतात. काँग्रेस, ठाकरे व शिंदे शिवसेनेसह मनसेच्या भूमिकेकडे लक्ष असून राष्ट्रवादी व जनता दल दोघांशीही भाजपची चर्चा सुरू आहे . अनुसूचित जाती नगराध्यक्ष उमेदवारीबाबत 'वेट अण्ड वॉच' भूमिका आहे.

पन्हाळा नगरपालिका हा जनसुराज्य शक्तीचा बालेकिल्ला असल्यामुळे सत्ता राखण्याचे जनसुराज्यसमोर आव्हान असणार आहे. 20 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी व बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच नेते व आघाडी प्रमुख सौभाग्यावातींच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. ठाकरे गटाचे नेते सत्यजित पाटील-मोकाशी आघाडीत सक्रीय झाल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील इतर घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची भूमिकाही महत्त्वाची आहे . निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. पेठवडगाव नगरपालिकेचे निवडणूक 20 जागांसाठी होणार असून यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती महाआघाडीत सामना रगणार असल्याचे पहिल्या टप्प्यात दिसते. नगराध्यक्षपदासाठीच विद्या पोळ विरुद्ध प्रविता सालपे यांच्यात लढत आहे. युवक क्रांती आघाडीसमोर नगराध्यक्ष तगडा उमेदवार उभे करण्याचे आव्हान असून नगराध्यक्ष उमेदवारीवरून युवक क्रांती आघाडीमध्ये मतभेद सुरुवातीला दिसत आहेत.

खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने व भाजपची भूमिका महत्त्वाची आहे. हातकणंगले नगरपंचायतीसाठी 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. बहुरंगी लढतीची शक्यता, सोशल मीडियावर इच्छुक झलक पाहायला मिळत आहे. महायुती, महाविकास आघाडी, शिंदे सेना आणि अपक्ष लढण्यांसाठी सज्ज असून नेते, इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. नेत्यांकडे उमेदवारीसाठी ताकद लावून मागणी महायुती, महाविकास आघाडीकडून सावध पावले उचलली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT