Mohite Patil Akluj Meeting  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Akluj Meeting : ‘शिवरत्न’वरील चर्चेनंतर जयंत पाटलांचे मोठे भाकित; येत्या 10 दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडतील...

Madha Lok Sabha Constituency : शरद पवार यांनी मला पाठवलेले नाही. इंडिया आघाडीची बैठक होती. मात्र, माझी एक खासगी बैठक आहे, त्यामुळे मी गैरहजर राहणार आहे, असे शरद पवार यांना सांगूनच मी आलो आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कामगिरी अकलूजच्या भूमीने केलेली आहे. यापुढेही तशी कामगिरी व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. तसेच, येत्या दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे बदल घडतील, असे भाकित शेतकरी कामगार पक्षाचे सचिव जयंत पाटील यांनी ‘शिवरत्न’वरील मोहिते पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सांगितले.

मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये (Akluj) शिवरत्न बंगल्यावर एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील (Jayant Patil), आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीनंतर जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी खास विजयदादांना भेटायला आलो होतो. मी आल्यामुळे आजूबाजूचे सर्व लोक आले होते. आज कोणतीही राजकीय चर्चा आतमध्ये झालेली नाही. मी बऱ्याच दिवसानंतर विजयदादांना भेटलो. मी येणार म्हटल्यावर त्यांनी बाकीच्याही लोकांना बोलावले. पण आमची कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही.

इंडिया आघाडीची बैठक होती. मात्र, माझी एक खासगी बैठक आहे, त्यामुळे मी गैरहजर राहणार आहे, असे शरद पवार यांना सांगूनच मी आलो आहे. शरद पवार यांनी मला पाठवलेले नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून इंडिया आघाडीचे प्रमुख आम्ही शरद पवार यांच्याकडे बघतो, त्यांचे आदेश आम्ही पाळतो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मानतो. माढ्याची जागा आम्ही मागितलेली आहे. पण त्यावरही काही चर्चा झालेली नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज (ता. १७ मार्च) आम्हाला स्नेहभोजनासाठी बोलावले होते. आज कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही. आजच्या घटकेला विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार मिळाली नाही म्हणून नाराज आहेत, असं काहीही नाही. आम्हाला विजयदादांनी बोलावलं; म्हणून आम्ही आलो होतो.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असे म्हटलं होतं. पण तो एक वेगळा भाग आहे, तो फलटणपुरता मर्यादित होता, असेही रामराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

माढ्याचे शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हणाले, मोहित पाटील यांची २००९ पासून मानहानी होत आहे. आता त्यांनी धाडस करण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT