Ncp News : लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी दुपारी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जागावाटप फायनल करण्यावर भर दिला जात आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत शुक्रवारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यापूर्वीच शुक्रवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले? त्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.
रासपचे नेते महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपसोबत राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी महादेव जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जानकर यांनी पवार यांच्यासोबत बैठक झाल्याचे मान्य केले. या वेळी निवडणुकीच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. पुढील काही दिवसांत मी पुन्हा त्यांची सविस्तर भेट घेणार आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलणार आहे, त्यामुळे मी आताच काही बोलणे उचित ठरणार नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. यामुळे हा मतदारसंघ जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे शुक्रवारी महाविकास आघाडीची संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते.
रासपसध्या महायुतीसोबत आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना परभणी अथवा माढा यापैकी एक जागा सोडली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने माढा येथील उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता परभणीची जागा भाजप सोडेल अशी जानकर यांना अपेक्षा आहे. मात्र, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात रासपला जागा सोडली गेली नाही तर ते महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महादेव जानकर (Mahadev janakar) गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) अशा दोन्ही बाजूंनी ते चाचपणी करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींची बाजू प्रखरतेने मांडल्याने त्यांच्या उमेदवारीला ओबीसी मतदार पाठिंबा देऊ शकतात. जानकर यांची सारी भिस्त ओबीसी मतदारांवर आहे. भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार असलेल्या ओबीसी मतदारांचा पाठिंबा जानकर यांना मिळाल्यास याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काळात जानकर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
R