Non-Teaching Staff Recruitment Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

School Recruitment : शिक्षकांनंतर आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘लॉटरी’! भरतीचा मार्ग मोकळा; सरकारचा नवा आदेश जारी

Maharashtra School Non Teaching Recruitment : सरकारच्या नव्या आदेशाने राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी स्वतंत्र ‘नॉन-टीचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवरील भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या संदर्भातील निर्देश दिले आहेत. त्यानुसार भरतीसाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाही पोर्टलच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मात्र, यापूर्वीच्या पदोन्नती आणि अनुशेषाच्या नियुक्त्यांचा मार्ग आधी मोकळा करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतरच रिक्त पदांच्या ८० टक्के जागा सरळसेवेने भरण्यास परवानगी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापनांकडून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

मुलाखतीचे इन-कॅमेरे चित्रिकरण बंधनकारक

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रिकरण करून त्याची नोंद जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे राहणार आहे. नियुक्तीच्या सुरुवातीची तीन वर्षे कालावधी मानधनावर असेल.

दरम्यान, २८ मे २०२५ पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाहीही पोर्टलवरूनच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोर्टल संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी लागणार आहे.

या निर्णयामुळे शिक्षक भरतीनंतर आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, पदोन्नती, अनुशेष आणि सरळसेवा भरती या टप्प्यांमुळे प्रत्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT