Pune News : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषरहित आणि अचूक करण्यासाठी तब्बल २४ वर्षांनंतर राबवल्या जाणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसएसआर) मोहिमेत शिक्षकांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण अखेर काहीसा कमी झाला आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ म्हणून पूर्ण वेळ नियुक्त केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ज्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा संतप्त सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला होता. तसेच या निर्णयाच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर निवडणूक आयोगाला आपल्या भूमिकेत बदल करावा लागला असून, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आता सुधारित आदेश जारी केले आहेत. या नवीन नियमानुसार, शिक्षकांना आता 'बीएलओ'चे काम पूर्णवेळ न करता, शाळांमधील शैक्षणिक कामे पूर्ण केल्यानंतर उर्वरित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशीच करावे लागणार आहे.
राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी हे सुधारित आदेश जारी करत सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत मतदार याद्यांचे काम पूर्ण करणे बंधनकारक असले, तरी शिक्षकांच्या अध्यापन कार्यात कोणताही खंड पडू नये, याची थेट दखल प्रशासनाला घ्यावी लागली आहे.
यापूर्वी काही ठिकाणी शिक्षकांना बीएलओच्या कामासाठी शाळेतून थेट कार्यमुक्त करण्यावरून मोठा गोंधळ उडाला होता, त्याला आता या नव्या आदेशामुळे पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक कामकाज पार पाडण्याकरिता पुरेसा वेळ मिळावा, यासाठी सर्व शाळा प्रशासनांना विशेष मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.
या सुधारित निर्णयानुसार, ज्या शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांच्या शाळेतील शिक्षण तासिका कमीत कमी आणि सलग ठेवल्या जाणार आहेत. जेणेकरून त्यांना त्यांचे नेहमीचे शैक्षणिक काम पूर्ण करून उर्वरित वेळेत निवडणूक कर्तव्य पार पाडता येईल.
इतकेच नव्हे तर, बीएलओची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांना शाळेतील इतर शिक्षकांनीही कामात मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कामाचा भार एकाच व्यक्तीवर पडणार नाही. निवडणूक आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधण्यासाठी प्रशासनाने हा मधला मार्ग काढला असला, तरी सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागणार असल्याने प्रत्यक्ष मैदानावर याची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.