ChandrashekharBawankule, Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar : कॅसिनो विधेयकासाठी रोहित पवारांकडून ‘अनुभवी’ बावनकुळेंची ‘शिफारस’

राजेंद्र त्रिमुखे

Maharashtra Politics : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बुधवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे बहिष्कार घातला आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत यावरून बोचरी टीका-टिपण्णीला सुरुवात झाली. आता विरोधी पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही गुरूवारी कॅसिनो विधेयकावर सरकारला खोचक सल्ला देत टीका केली आहे.

नुकतेच शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील कॅसिनो मध्ये कथित जुगार खेळतानाचे फोटो व्हायरल करत एकच खळबळ उडवून दिली होती. बावनकुळे यांनी साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी जुगारावर लावल्याचा दावा करत बावनकुळे यांच्यासह भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाचा संदर्भ घेत रोहित पवारांनी आज एक ट्विट करत सरकारला चपराक लगावली आहे.

सरकार आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी "सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 - महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, 2023" सभागृहात मांडत आहे. विषय पत्रिकेत तो विषय आहे. या अनुषंगाने पवार यांनी एक ट्विट केले आहे. दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. परंतु या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं… हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती," असे ट्विट मध्ये म्हटले आहे.

ट्विटच्या माध्यमातून आमदार पवारांनी सरकारला खोचक सल्ला देत सरकारसह बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सोबत #गोंधळलेले_निकामी_सरकार असा हॅश टॅग वापरत सरकारवर टीकेची संधी साधल्याचे दिसत आहे. तसेच अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून बावनकुळे यांचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT