Raju Shetty
Raju Shetty sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात महाविकास, भाजपचे राजकिय टोळी युद्ध; शेट्टी म्हणतात, 'दोघेही तसलेच'

सरकारनामा ब्युरो

सातारा ः राज्यात वीजेची कृत्रिम टंचाई निर्माण करून खासगी वीज चढ्या दराने खरेदी केली जात आहे. याविरोधात आपण आवाज उठविणार असून जनतेच्या पैशावर कोणी दरोडा टाकत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही महाजनकोचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी व भाजपचे प्रकारचे राजकिय टोळी युद्ध सुरू असून दोघेही तसलेच आहेत. भाजपमध्ये शेतकऱ्यांना बुडविणारे कारखानदार नाहीत का, महाविकास आघाडीत सगळेच साधुसंत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

श्री. शेट्टी आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी सातारा शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जून साळुंखे, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲड. विजय चव्हाण उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, महावितरण कंपनी वाढीव दराने वीज खरेदी करत आहे. महावितरणची दहा हजार मेगावॅट विज निर्मितीची क्षमता असताना चार हजार मेगावॅटची यंत्रणा तशीच थांबून आहे. त्याला कोळसा, गॅस उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. मुळात महाराष्ट्रात वीजेची टंचाई नाही. पण, खासगी क्षेत्रात मुबलक वीज उपलब्ध असून ती जादा दराने खरेदी केली जात आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर सर्वांधिक आहेत.

महावितरणची क्षमता असूनही खुल्या बाजारातून खासगी वीज खरेदी केली जात आहे. याचे पैसे सर्वसामान्य ग्राहक भरतो आहे. यावर महाजनकोने आपली विजनिर्मितीची क्षमता वाढविणे हाच उपाय आहे. मात्र, नेमकं उलट होतंय. क्षमता असताना वीज निर्मिती केली जात नाही. त्यामुळे खुल्या बाजारातून वीज खरेदी करताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. वीजखरेदीत वर्षाला ३० हजार कोटींचा भ्रष्टाचार होत आहे, याविषयी आपण आवाज उठविणार का, या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, आम्ही निश्चित आवाज उठविणार असून हा जनतेचा पैसा असून यावर दरोडा पडणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करणे व आवाज उठविणे हे आमचे काम आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ही चळवळ आमची रोजीरोटीचे साधन नाही. आमचे कर्तव्य आम्हाला हाक मारते, त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. सध्या राज्यात सत्ताधारी व विरोधक सोईस्करपणे एकमेकांचे काढत आहेत. राज्यात एक प्रकारचे राजकिय टोळी युद्ध चालू आहे. भाजपमध्ये शेतकऱ्यांना बुडविणारे कारखानदार नाहीत का, महाविकास आघाडीत सगळेच साधुसंत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून श्री. शेट्टी म्हणाले, सगळे तसलेच आहेत. सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या बाजूने आम्ही आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला तुरूंग नवीन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाच एप्रिलला भूमिका जाहीर करणार...

सध्या राज्यात सत्ताधारी व विरोधक या दोघांचाही तुम्हाला अनुभव आहे. या दोघांच्याबद्दल तुमची काय भूमिका राहणार आहे, असे विचारले असता श्री. शेट्टी म्हणाले, त्यांच्याबद्दल येत्या पाच एप्रिलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT