Kolhapur Zilla Parishad Election Results 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं भिजत घोंगड; CM फडणवीस घोषणा करणार, पण मुश्रीफांच्या मागणीचं काय?

Kolhapur Zilla Parishad president announcement : जिल्हा परिषदेवर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याने राष्ट्रवादीचा पहिला अध्यक्ष करण्याचा मंत्री मुश्रीफ यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आमचाच अध्यक्ष होणार याबाबतचा दावा केला होता. भाजपकडून पहिला अध्यक्ष होण्यासाठी मुंबई स्तरांसह जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांकडून मुश्रीफ यांच्यावर सातत्याने दबाव ठेवला जात होता.

Rahul Gadkar

Kolhapur News, 05 Mar : महिना उलटला तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत चुरस सुरू असून जिल्हा परिषदेवर पहिला अध्यक्ष कुणाचा होणार यावरून चढाओढ सुरू आहे.

त्या संदर्भात आज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाव घोषित करणार आहेत. त्याबाबतचा निर्णय कोल्हापुरातील सर्वच महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आजच्या बैठकीत घेतला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष कोणाचा होणार यासंदर्भात आज मुंबईमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, जनसुराज्येचे समित कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली.

जिल्हा परिषदेवर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याने राष्ट्रवादीचा पहिला अध्यक्ष करण्याचा मंत्री मुश्रीफ यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आमचाच अध्यक्ष होणार याबाबतचा दावा केला होता.

भाजपकडून पहिला अध्यक्ष होण्यासाठी मुंबई स्तरांसह जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांकडून मुश्रीफ यांच्यावर सातत्याने दबाव ठेवला जात होता. महायुतीतील घटक पक्षातच अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याने जिल्हास्तरावर हा प्रश्न सुटणार नाही याची खात्री नेत्यांना झाली.

अखेर या संदर्भात बैठक घेत त्यावर तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला. राष्ट्रवादीकडून पहिला अध्यक्ष होण्याचा दावा ठाम होता. तीच भूमिका मुश्रीफ यांनी कायम ठेवली. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी देखील पहिला अध्यक्ष भाजपचा होण्यासाठी आपली भूमिका ठाम ठेवली. बुधवारी रात्री आठ वाजता ही बैठक सुरू झाली. जवळपास सव्वा तास चर्चा सुरू होती. अखेर त्या संदर्भात कोणताच निर्णय न झाल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलण्याचा निर्णय झाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात निर्णय घेऊन मुख्यमंत्री अध्यक्षपदाचे उमेदवार घोषणा करतील असा निर्णय घेण्यात आला. फडणवीस जो निर्णय देतील तो महायुतीच्या सर्वच नेत्यांना आणि घटक पक्षातील आमदारांना मान्य असेल. असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतल्यास उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीला मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अध्यक्ष पद मिळाले तर भाजपला उपाध्यक्ष, सभापतीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनसुराज्य, शिवसेना, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीला एक एक सभापती पद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT