Kolhapur Politics  Sarakrnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या राजकारणातला जुगाड; सहकारी संस्थामध्ये गट्टी,विधानसभेला मैत्रीला सुट्टी...

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : जिल्हा बँकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, जनसुराज्य अशा पक्षांचे संचालक आहेत. यातील काहींनी एक नव्हे तर दोनवेळा राजकीय पक्षांतर केले आहे.

Deepak Kulkarni

लुमाकांत नलवडे

Kolhapur News: राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, तसेच कुणीच कोणाचा मित्रही नसतो. सत्तेसाठी ही सर्व नेतेमंडळी शत्रूत्व विसरुन कधी मैत्रीची गाठ बांधतील याचा नेम नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचीही काहीशी अशीच गत सध्या आहे. सहकार संस्थांमध्ये गट्टी आणि राजकारणात मैत्रीला सुट्टी अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला आहे.जिल्हा दूध संघ (गोकुळ),जिल्‍हा बँक,शेतकरी सहकारी संघ अशा सहकारी संस्थांमध्ये सर्वपक्षीय एकत्रित आले आहेत. गुण्यागोविंदाने सत्ता उपभोगत आहेत.मात्र, विधानसभा आणि राज्याच्या राजकारणात यांनी एकमेकांच्या मैत्रीला सुट्टी दिली आहे.तेथे मात्र ते शड्डू ठोकून एकमेकांच्या विरोधात उभे असतील असं चित्र दिसून येत आहे.

राजकारणात आणि प्रेमात कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसते. तेथे सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. पूर्वी एका विचारावर राजकारण चालत होते. मात्र, परिस्थिती बदलत गेली आणि स्वार्थासाठी प्रत्येकजण राजकारणाचा उपयोग करू लागला. स्वार्थासाठी पक्ष बदलू लागला. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी पाहिजे ती भूमिका घेऊ लागला. यातून विचारांना मूठ माती मिळाल्याचे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील चित्र आहे. त्याचा थेट संदर्भ जिल्ह्यातील सहकारातील संस्थांमध्ये आता दिसत आहे.

जिल्हा बँकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, जनसुराज्य अशा पक्षांचे संचालक आहेत. यातील काहींनी एक नव्हे तर दोनवेळा राजकीय पक्षांतर केले आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीनंतर त्या पक्षातील फुटीच्या राजकारणाचा परिणाम सहकारावर झालेला दिसत नाही. तेथे ते गुण्यागोविंदाने सत्ता उपभोगत आहेत. जिल्हा दूध संघ (गोकुळ) मध्ये काही प्रमाणात अशीच स्थिती आहे.

एक महिला संचालक वगळता इतरांनी एकमूठ केली आहे. शेतकरी सहकारी संघाच्या गगनभरारी कारभाराने आता तळ गाठला आहे, तरीही तेथे सर्वपक्षियांनी संगणमताने सत्ता घेतली आहे. असे असतानाही संघ अद्याप उभारी घेताना दिसत नाही. यावरून सहकारात नेतेमंडळींची एकमुठ दिसून येते. तेथे विरोध बाजूला ठेवून ते कारभार करीत असल्याचे जाणवते.

सहकारी संस्थांत एकी असली तरीही विधानसभेच्या राजकरणात सर्वांनी मैत्रीच्या गट्टीला सुट्टी दिली आहे. तेथे ते एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत. गोकुळ, जिल्‍हा बॅंकेत कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ एकत्र आहेत. मात्र, कागलमध्ये आमदार पाटील हे समरजितसिंह घाटगे यांच्या बाजून मुश्रीफांच्या विरोधात असणार आहेत.

माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात राहणार आहेत. तेही जिल्हा बँकेत संचालक आहेत. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे सुद्धा बॅंकेत सत्तेत आहेत. तरीही त्यांनी करवीर विधानसभा मतदार संघातून एका उमेदवाराचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सहकारात गट्टी असलेल्या नेत्यांची राजकरणात मैत्रीला सुट्टी असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT