Satara ZP Reservation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Reservation : ग्रामविकास मंत्र्यांच्या ‘माण’मध्ये दोन्ही पवारांच्या चेल्यांमध्येच बिग फाईट?; अरुण गोरेंची एन्ट्री वाढवणार चुरस...

Maan Political News : माण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांचे आरक्षण जाहीर झाले. अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्गज नेते पंचायत समितीत उतरण्याची शक्यता वाढली आहे.

रुपेश कदम
  1. माण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून, केवळ कुकुडवाड गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला राहिल्याने येथे तीव्र लढत अपेक्षित आहे.

  2. अनिल देसाई (अजित पवार गट) आणि अभयसिंह जगताप (शरद पवार गट) यांच्यात कुकुडवाडमध्ये सामना होण्याची शक्यता असून, जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे उतरल्‍यास तिरंगी लढत ठरू शकते.

  3. माण पंचायत समिती सभापतिपद खुले राहिल्याने अनेक इच्छुकांनी जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीत नशिब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे.

Dahiwadi, 13 October : सातारा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या सुप्त आकांक्षांना घुमारे फुटले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी' आरक्षित झाल्याने आणि माण पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण अर्थात खुले असल्याने दिग्गज मंडळी पंचायत समितीत नशीब अजमावण्याची शक्यता आहे. कुकुडवाड वगळता सर्वच गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक मान्यवरांना आपली तलवार म्यान करून सौभाग्यवतींना मैदानात उतरवावे लागणार आहे.

माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पाहायला मिळू शकते. या गटात दोन्ही पवारांचे चेले तुल्यबळ असून त्या दोघांमध्ये जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे बंधू अरुण गोरे यांनी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली तर या गटात बिग फाईट होऊ शकते.

पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते ज्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते, ते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण अखेर आज (ता. १३ ऑक्टोबर) जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर माण (Maan) तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या बहुतेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

माण तालुक्यातील पाचपैकी गोंदवले बुद्रुक हा गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. आंधळी, बिदाल आणि मार्डी हे गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. केवळ कुकुडवाड गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, यात शंका नाही.

कुकुडवाड गट हा सर्वाधिक चुरशीचा आणि लक्षवेधी ठरणार आहे. या गटात सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई हे मातब्बर आहेत. त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते कट्टर गोरे विरोधक म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे, माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केलेले उद्योजक अभयसिंह जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते याच गटात आहेत. त्यामुळे पवारांच्या दोन चेल्यांमध्ये माण तालुक्यात ‘बिग फाईट’ होऊ शकते.

दरम्यान, पवारांच्या दोन शिलेदारामध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे ऐनवेळी भाजपकडून अरुण गोरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतात. कुकुडवाडमधून देसाई आणि जगताप यांच्यासोबत अरुण गोरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास इथे 'हाय व्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळू शकतो.

आंधळी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असला तरी इथे शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे, दादासाहेब काळे यांच्या पत्नी मीनाक्षी काळे हे मैदानात उतरण्याची  शक्यता  आहे. त्यामुळे या ठिकाणाही तुल्यबळ लढत होऊ शकते.

पंचायत समिती सभापतिपदासाठी मोठी चुरस

माण पंचायत समितीचे सभापतिपद खुले झाल्याने पंचायत समितीसाठी मोठी रस्सीखेच होणार यात शंका नाही. सात गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून त्यात तीन महिलांसाठी तर चार खुले आहेत. या परिस्थितीमुळे जिल्हा परिषद राहिली, पंचायत समिती तर लढूया अशी मानसिकता बहुतेकांची झाली आहे. मात्र इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवारी देताना नेतेमंडळींची दमछाक होणार हे नक्की.

प्रश्न 1 : माण तालुक्यातील कोणता गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला राहिला आहे?
👉 कुकुडवाड गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला राहिला आहे.

प्रश्न 2 : कुकुडवाड गटात कोणांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे?
👉 अनिल देसाई, अभयसिंह जगताप आणि शक्य असल्यास अरुण गोरे यांच्यात ‘बिग फाईट’ होऊ शकते.

प्रश्न 3 : जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे?
👉 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे.

प्रश्न 4 : माण पंचायत समितीचे सभापतिपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
👉 सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी असून त्यामुळे मोठी चुरस अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT