
Satara, 25 August : अजितदादा तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या हृदयामध्ये आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, ही वानरसेना घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे. या वानरसेनेच्या जीवावर तुमच्या आशीवार्दाने सेतू बांधून लंका सर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही फक्त लढ म्हणा. माण-खटावमध्ये चमत्कार झालेला दिसेल, असे अभिवचन मी तुम्हाला देतो, असे सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
माण खटावचे नेते अनिल देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेत देसाई यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले, अजितदादा आम्ही 2012 मध्ये तुमच्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यामध्ये लक्ष्मणतात्या पाटील, सदाशिव पोळ, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घार्गे होते. त्या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होती.
त्या बैठकीत तुम्ही मला सांगितलं होतं की, अनिल देसाई (Anil Desai) तू गोंदवले गटात उभा राहा. दोन गट निवडून आले पाहिजेत. तुमच्यापासून आम्ही आलो. पण, आल्यावर काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमच्या विरोधात प्रचारासाठी येथे येत होते. आम्ही तुम्हाला शब्द देऊन आलो होतो आणि त्यावेळी माण पंचायत समितीत पाच-पाच असे सदस्य झाले होते आणि चिठ्ठीवर सभापती-उपसभापती आपला झाला होता, अशी आठवणही अनिल देसाई यांनी सांगितली.
ते म्हणाले, तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या हृदयात आहे. पण, आमचं हृदय आता बंद पडतंय की काय, अशी परिस्थिती आमची झाली आहे. एवढं आमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांवर प्रेशर आहे. अजितदादा, माण-खटावमधील लोक दबलेली आहेत, याचा अर्थ असा नाही की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी लोक नाहीत. मोठ्या संख्येने लोक राष्ट्रवादीच्या पाठीशी आहेत.
तुमच्या दौऱ्याच्या निमित्ताने खटावमधील लोकांनी स्वागताचे बॅनर लावले होते. पण इथल्या महमंद तुघलकी प्रशासनाने एक फतवा काढला की, ज्यांची परवानगी घेतली नाही, ते बॅनर काढून टाका. काहींनी काढले, पण अनेकांनी तसेच कायम ठेवले आहेत. पण, अजितदादा तुम्ही सांगितलं पाहिजे की, हे महायुतीचे सरकार आहे. ही माण-खटाव तालुक्यातील माणसंही राष्ट्रवादीच्या पाठीशी आहेत, अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.
देसाई यांनी सांगितले की, आमचे अर्थमंत्री येत आहेत, तुमची फी किती आहे, ते भरून घ्या. पण, आमचा एकही फ्लेक्स बोर्ड निघणार नाही, असे मी बीडीओंना सांगितले. कायदा सर्वांना सारखा आहे; पण, माण खटावमध्ये कायदा फक्त विरोधकांना वाकवण्यासाठी वापरला जात आहे. हा कायदा यापुढे चालणार नाही, यासाठी मकरंद आबा आणि नितीन पाटील यांना विशेष लक्ष द्यावे लागेल.
‘माझ्या कार्यकर्त्यांचं रक्षण करा’
दादा, आम्ही पहिलीच आपलीच माणसं आहोत. मागंही आपल्याकडेच होतो आणि आपलचं काम करत होतो. विकास कामं करताना माझ्या कार्यकर्त्यांचे रक्षण करा, ही माझी विनंती आहे, अशी मागणीही अनिल देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.