Karad, 17 March : फलटणमधील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हे अलर्ट झाले आहेत. फलटणच्या घटनेचा धडा घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसंदर्भातील रणनीती या दोन्ही पक्षांनी बदलली आहे. जिल्हा परिषदेच्या गेटवर थेट मतदानासाठी सदस्यांना घेऊन येण्याचे ठरविण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपही झेडपी अध्यक्षपदासाठी इरेला पेटला आहे, त्यामुळे सातारा झेडपीचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
सातारा जिल्हा परिषद (Satara zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची येत्या शुक्रवारी (ता. २० मार्च) निवड होणार आहे. मात्र, पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत फलटणमध्ये झालेल्या घडामोडींमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी सोमवारी (ता. १७ मार्च) पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महाबळेश्वर, खंडाळा, वाई, कोरेगाव, माण या पाच, तर भाजपने फलटण, कऱ्हाड, सातारा, खटाव, जावळी या ठिकाणी, शिवसेनेचा पाटणमध्ये सभापती झाला.
फलटणमध्ये १६ जागांपैकी शिवसेनेचे (Shivsena) सर्वाधिक आठ, भाजपचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले होते. शिवसेना आणि भाजप-राष्ट्रवादी आघाडी यांच्याकडे प्रत्येकी आठ-आठ सदस्यांचे बलाबल होते, त्यामुळे सभापती निवड ईश्वर चिठ्ठीवर होणार अशी चर्चा होती. मात्र, माजी खासदार नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना भाजप प्रवेश देत सभापतिपद पटकावले. या घडामोडींमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही धेाका होऊ शकतो, याचा अंदाज महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादीला आला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. मतदारांनीही कोणालाच स्पष्ट कौल दिलेला नाही. जिल्हा परिषदेच्या ६५ सदस्यांपैकी भाजपचे २७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १५, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी एक आणि भाजपचे बंडखोर अपक्ष एक असा कौल मतदारांनी दिला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होणार, अशी अनेकदा सांगितले आहे. आमचे २८ सदस्य आहेत आणि ते सर्वाधिक असल्याने अध्यक्षपदावर आमचाच अधिकार आहे, असे स्पष्ट केले आहे. झेडपी अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सोडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
झेडपीत भाजप मोठा पक्ष राहिला असला तरी सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती राहिल्या आहेत. भाजपला सहा जागा कमी पडत असून, सत्तेसाठी तडजोडी, वाटाघाट्या सुरू आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेही सावध पवित्रा घेत भाजपला अंधारात ठेवत पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री देसाई यांनी भाजपसोबत चर्चा झाल्यास मकरंद पाटील यांना सोबत घेणार असल्याचे सांगितल्याने राजकीय समीकरणाचा गुंता वाढत चालला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी झेडपी अध्यक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होणार, असे जाहीर केले आहे. मात्र, पालकमंत्री देसाई यांच्याकडून शिवसेनेतर्फे अध्यक्षपदावर दावा न करता सावध भूमिका घेतली आहे. त्यातच फलटणमधील घडामोडीमुळे भाजप काहीही करू शकतो, याचा अंदाज आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे नेते अलर्ट झाले आहेत. ऐनवेळी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दिवशी काहीकाळ अगोदरच सदस्य जिल्हा परिषदेत येतील, अशी व्यूहरचना आखली आहे.
दीड महिन्यापेक्षा अधिक काळ अज्ञातवास
झेडपीचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उपाध्यक्ष करायचा, या इराद्याने दोन्ही पक्षाच्या सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हे सदस्य सहलीवर आहेत, त्यातील काही सदस्यांना घरातील लग्न, कुटुंबातील मुलांचे दहावीचे पेपर, अन्य समारंभ असूनही उपस्थित राहता आलेले नाही, त्यामुळे कधी एकदा अध्यक्ष निवड पार पडेल, अशी त्यांची मानसिकता झाल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.