बिजवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्पिता महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपतर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. तालुकानिहाय गट, गणनिहाय बैठका, जाहीर सभांच्या माध्यमातून भाजप, मोदींनी केलेल्या कार्याची माहिती जनतेला दिली जाणार आहे. शक्ती केंद्रे आणि बुथ सक्षमीकरण मोहिमेतून जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून मिशन सातारा जिल्हा परिषद सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने दिली आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपने पक्षाचे वर्चस्व नसलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्हा भाजपतर्फे १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली १७ आणि १८ तारखेला फलटण तालुक्यात गण आणि गटनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. यावेळी पक्षात नव्याने दाखल होणाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. बुथ आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
पक्षसंघटन बळकट करण्याबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनिती आखण्यात येणार आहे. १८ तारखेला सायंकाळी गजानन चौकात जाहीर सभा होणार आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी वाई -खंडाळा तालुक्यात भाजपची बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. २३ आणि २४ रोजी कराड उत्तर तर २६ आणि २७ रोजी कराड दक्षिण मतदारसंघ ढवळून काढण्यात येणार आहे. २९ आणि ३० तारखेला पाटण आणि कोरेगाव तालुक्यात बैठका पार पडणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपचे मिशन जिल्हा परिषद जोमाने राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या केंद्र सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देणारा रथ जिल्ह्यात फिरणार आहे. त्याबरोबरच मोदींच्या कामांची माहिती देणारी व्हिडिओ क्लीप दाखविण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. भाजपच्या मिशन सातारा जिल्हा परिषद आणि सेवा पंधरवड्याची सांगता सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.