मलकापूर : येथील पालिका निवडणुकीसाठी पहिल्यापासूनच भाजपला पोषक वातावरण होते. त्यामुळेच मतदानापूर्वी भाजपने 6 जागांवर बिनविरोध निवडीने खाते उघडले होते. त्यातून भाजपचे मनोबल वाढले. उर्वरित सर्वच जागा जिंकून 22-0 करण्याचा भाजपने निर्धार केला. मात्र, ऐनवेळी मैदानात उतरूनही भाजपच्या या निर्धाराला राष्ट्रवादी समविचारी आघाडीने सुरुंग लावला. भाजपपुढे एकही जागा जिंकता येणार नसल्याची परिस्थिती असताना उदयसिंह उंडाळकर यांच्या नेतृत्वातील आघाडीने 4 जागा जिंकून मिळवलेले यश भाजपला चिंतन करायला लावणारे आहे.
अनेक प्रभागांत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी काम केल्याने 'गड आला पण सिंह गेला' अशी स्थिती निर्माण झाली. बहुतेक प्रभागांत भाजपचे मताधिक्यही घटले. याचा फटका दिग्गजांना बसला. माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नियोजन सभापती प्रशांत चांदे, माजी नगरसेवक दिनेश रैनाक या मातब्बरांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग 11 मध्ये राजकीय पार्श्वभूमी नसताना नवखा अपक्ष उमेदवार अनुराज थोरात यांनी शिंदेंविरोधात निवडणूक लढवली. ही लढत अटीतटीची झाली. थोरात यांनी 804 मते घेतली. त्यांचा अवघ्या 166 मतांनी पराभव झाला. 25 वर्षे सत्ता असणाऱ्या शिंदे यांची नाराजी यावरून स्पष्ट दिसून आली.
भाजपचे निष्ठावंत राजू मुल्ला यांनी यापूर्वी प्रभाग दोनचे तीनदा नेतृत्व केले होते. त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा होत्या. प्रभागात त्यांचा दबदबा आहे. उमेदवारी डावलल्याने मुल्ला व त्यांच्या कार्यकर्त्यात चीड असल्याने त्यांनी भाजपविरोधात काम केले. अपक्ष उमेदवार भीमाशंकर माऊर यांना त्यांनी पाठिंबा दिला. निकालातून मुल्ला यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातील त्यांची ताकद दाखवून दिली. त्यामुळेच माऊर यांचा विजय सुकर झाला. श्री. माहूर यांच्यासाठी मुल्ला हे किंगमेकर ठरले.
प्रभाग पाचमध्ये माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांचा अनपेक्षित पराभव झाला. भाजपचे (BJP) एकनिष्ठेने काम करूनही ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या तानाजी देशमुख यांनी या प्रभागात उघडपणे राष्ट्रवादी आघाडीचे काम केले. उमेदवार दादा शिंगण व मृणालिनी इंगवले यांना पाठिंबा देत त्यांना विजय मिळवून दिला.
प्रभाग एकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन विष्णुपंत काशीद यांनी प्रशांत चांदे यांचा बालेकिल्ला काबीज केला. चांदेंचा त्यांनी 319 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपक्ष माऊर यांनी भाजपचे दिनेश रैनाक यांचा 106 मतांनी पराभव केला. प्रभाग चारमध्ये माजी नगराध्यक्ष कल्पना रैनाक यांनी माजी नगरसेविका आनंदी शिंदे यांचा 46 मतांनी पराभव केला. प्रभाग पाचमध्ये राजेंद्र यादव यांचा दादा शिंगण यांनी पराभव केला. प्रभात आठमध्ये माजी नगरसेवक सागर जाधव यांचा शरद पवार यांनी पराभव केला.
बीडीएसचे शिक्षण घेणाऱ्या नवख्या व प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या 21 वर्षांच्या आर्यन कांबळे याने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. बलाढ्य भाजपपुढे निवडणूक लढविणे आव्हान असतानाही त्याच्याशी दोन हात करत आर्यनने तब्बल पाच हजार 472 मते घेतली. त्याला मिळालेल्या मतांवरून अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची येथील ताकद दर्शवते, हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.