Jayakumar Gore and Shekhar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Man-Khatav Assembly Election : गोरे बंधुंचे मनोमिलन होणार? एका तपानंतर एकत्र येण्याची शक्यता

Man-Khatav Politics : माणच्या राजकारणात आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांनी एकत्रच राजकारणाला सुरूवात केली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरेंनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी जयकुमार गोरे निवडून आले होते. मात्र नंतरच्या काळात राजकारणातून सन 2012 पासून दोघे बंधू वेगळे झाले.

विशाल गुंजवटे

Satara News, 30 Oct : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड झाली असून त्याचा मोठा तोटा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) होणार आहे. कारण उमेदवारी डावलली आहे.

याच्या निषेधार्थ आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे शेखर गोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत एका तपानंतर माण खटाव मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांचे मनोमिलन होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

माणच्या (Man) राजकारणात आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांनी एकत्रच राजकारणाला सुरूवात केली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरेंनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी जयकुमार गोरे (Jayakumar Gore) निवडून आले होते. मात्र नंतरच्या काळात राजकारणातून सन 2012 पासून दोघे बंधू वेगळे झाले.

सन 2014 ला शेखर गोरेंनी आमदार गोरेंच्या विरोधात विधानसभेला उभं राहत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यानंतर तर या दोघांत जास्तीचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. जिल्हा बँक निवडणुकीत गोरेंविरोधात कै. सदाशिव पोळ तात्यांना शेखर गोरेंनी मदत केली. तर विधानपरिषद निवडणुकीत शेखर गोरेंच्या विरोधात जाऊन आमदार गोरेंनी सांगलीच्या कदम कुटुंबियांना मदत केली होती.

मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी एकमेकांना विरोध केला. सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीतही हे दोघेजण उभे होते. जिल्हा बँक निवडणुकीत शेखर गोरेंनी आमदार गोरेंच्या घरी जाऊन मदत मागितली होती. पण आमदार गोरेंनी मदत न करता त्यांना विरोध करत राष्ट्रवादीला (NCP) मदत करून रामराजेंशी हातमिळवणी केली. त्यामुळे गोरे बंधुंमध्ये दिवसेंदिवस राजकीय संघर्ष वाढत गेला.

साताऱ्यात (Satara) राजे घराण्यात भावाभावात राजकीय वैर सर्वांना माहिती होतं. साताऱ्याच्या हितासाठी दोन्ही राजे बंधुंमध्ये मनोमिलन झाले. तसेच मनोमिलन आपल्यात व्हावे यासाठी दोघांच्या कार्यकर्त्यांकडून गोरे बंधुंनी एकत्र यावे असे वारंवार आवाहन केले जात होते. मात्र तसे घडून येत नव्हते.

मात्र आताच्या माण-खटावच्या राजकीय घडामोडीत मोठा बदल झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व आघाडीच्या नेत्याकडून सततच्या फसवणुकी विरोधात शेखर गोरेंनी आवाज उठवत वेगळा निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आघाडीच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

आघाडीच्या गोड बोलण्यावरून किती दिवस त्यांची तळी उचलायची. ते नेहमीच आपली फसवणूक करतात. मग आपण तरी कायम त्यांना का मदत करायची? यावेळी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, शेखर गोरे काय आहे ते दाखवून द्या, त्यासाठी मग तुम्ही कोणताही निर्णय घ्या. आम्ही तुमच्याबरोबर कायम राहू, असं कार्यकर्ते म्हणत आहेत. त्यामुळे सन 2024 च्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 12 वर्षाच्या एका तपानंतर गोरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT