Maharashtra Politics : विकासाची ब्ल्यू प्रिंट ते धार्मिक ध्रुवीकरण..., 'भावा'ची कोंडी हीच मनसेची मुख्य रणनीती

MNS And Shivsena UBT : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, त्यावेळी राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे होती. नंतर त्यांच्या भूमिका बदलत गेल्या. आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही शिवसेना फुटीसाठी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत आहेत. उद्धव यांची अडचण कशी होईल, याचा प्रयत्न मनसेकडून केला जातो.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election: काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते निष्क्रिय होते. विरोधी पक्षनेत्यांनीच सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे उदाहरण ठळक आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले अजितदादा पवार हेही आता सत्ताधारी पक्षासोबत आहेत.

या काळात विरोधी पक्षाची जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी संधी होती. ती संधी त्या पक्षाने गमावली. सतत बदललेल्या भूमिकांमुळे मनसेला (MNS) ही जागा भरून काढता आली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

त्यानंतर सहाच महिन्यांत होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते स्वबळावर लढत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी विचार सोडला, अशी टीका त्यांनी केली आहे.

यावरून मनसेची विधानसभा निवडणुकीची रणनीती काय आहे, याचा अंदाज यायला हवा. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi), विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अडचण करणे, अप्रत्यक्षपणे महायुतीला फायदा होईल, अशी व्यूहरचना मनसेने केल्याचे दिसत आहे. ती कशी, हे समजण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Shrinivas Vanga : वनगा यांनी निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता होऊन चुकीचा संदेश देऊ नये..., शिंदेंच्या नेत्याने खडसावलं

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी युतीच्या विरोधात राज्यभरात सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांनी लक्ष्य केले होते. 'लाव रे तो व्हिडिओ' हा त्यांचा प्रयोग त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका बदलली.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कसे अडचणीत येतील, असा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी मुद्दा हाती घेतला तो मशिदींवरील भोंग्यांचा. हे भोंगे हटवावेत, यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले. राज्यात धार्मिक ध्रुवीकरण व्हावे, असेच त्यांचे प्रयत्न त्यावेळी होते. राज्यातील जनतेने त्यावेळी कमालीची संयम दाखवला होता. महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Maharashtra Election: होय, कोणत्याही पक्षाला एकदाही सर्व 288 मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत!

महायुतीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या अजेंड्यावरून मशिदींवरील भोंग्याचा विषय गायब झाल्याचे दिसत आहे. सातत्याने धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा करणारे, एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे राज ठाकरे दुसरीकडे मात्र शरद पवार यांच्यामुळे राज्यात जातीपातीचे राजाकरण वाढले, अशी टीका करत असतात.

भाजपचा अजेंडाही असाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतेही 'व्होट जिहाद'चा भ्रम पसरवून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत असतात. जातीपातीचे राजकारण करून मते मिळवण्याचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत, त्यामुळे समाजाने वेळीच जागे व्हायला हवे, असे राज ठाकरे म्हणतात. मग ते स्वतः धार्मिक ध्रुवीकरण कशासाठी करत असतात? त्याचे उत्तर आहे, मतांसाठीच.

महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे, असे एकेकाळी राज ठाकरे म्हणत असत. आता त्यांचे इंजिन थेट धार्मिक ध्रुवीकरणावर घसरले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता स्वबळावर विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसांआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत येणाऱ्या टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोलमध्ये सूट दिली.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची राणा भीमदेवी थाटातील 'ती' घोषणा निकालाआधीच हवेत विरली

टोलमाफीचा मुद्दा मनसेचा आहे. टोल माफ केल्याने मुंबईत मनसेला फायदा होईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नुकसान होईल, असाच प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवेसेनेने या मतदारसंघातून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या मतदारसंघात उमेदवार उतरवला आहे. सदा सरवणकर हे या मतदारसंघातून सलग दोनवेळा विजयी झालेले आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी इच्छा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली. त्यावर बराच खल झाला, मात्र निवडणूक लढवण्यावर सरवणकर हे सध्यातरी ठाम असल्याचे दिसून येत आहे. मी दबावाला घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून, अमित ठाकरे यांच्यासमोर तगडे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत आणखी काही घडामोडी घडतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांची कोंडी कशी होईल, यावरच राज ठाकरे यांचा अधिक भर दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांकडून सातत्याने मर्यादा सोडून टीका केली जाते.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांना जाहीर सभाही घेतली होती. राणे यांच्या विजयासाठी मनसेने त्या मतदारसंघात झोकून देऊन काम केले होते. विधानसभेला मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे लढणार आहे. यामागे काय रणनीती आहे, हो कोणाच्याही लक्षात येऊ शकते. त्याचा परिणाम काय होणार, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल.

Edited By Jagdish Patil

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com